कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळामुळे जडलेल्या विकारांनी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि कन्या सुचेतना असा परिवार आहे.
माकपचे ज्येष्ठ नेते भट्टाचार्य यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार शुक्रवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनानंतर रुग्णालयाकडे सुपूर्द केले जाणार आहे.
भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. भट्टाचारजी दिग्गज राजकीय नेते होते आणि राज्यासाठी त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले, असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भट्टाचार्य यांनी जे कार्य केले त्यासाठी ते दीर्घकाळ स्मरणात राहतील, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
भट्टाचारजी यांच्या सरकारचा २०११ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यातील डाव्या आघाडीची सद्दी संपुष्टात आली होती. तेव्हापासून भट्टाचार्य हे आपल्या दोन खोल्यांच्या निवासस्थानातच वास्तव्याला होते आणि ते फारसे कोणाला भेटतही नव्हते.