अदानी समूह देशात फॉर्म्युला-१ पुन्हा आणण्याच्या तयारीत

ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पुन्हा एकदा फॉर्म्युला-१ शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी आता अदानी समूह काम करत आहे. अदानी सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी ही माहिती दिली.
अदानी समूह देशात फॉर्म्युला-१ पुन्हा आणण्याच्या तयारीत
अदानी समूह देशात फॉर्म्युला-१ पुन्हा आणण्याच्या तयारीतPhoto : X (@ANI & @AlpineF1Team)
Published on

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पुन्हा एकदा फॉर्म्युला-१ शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी आता अदानी समूह काम करत आहे. अदानी सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी या सर्किटला भेट देऊन यमुना एक्स्प्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. "मी खूपच उत्सुक असून लवकरच बुद्ध सर्किटशी करार केला जाणार आहे. देशात पुन्हा एकदा फॉर्म्युला १ परत आणण्यासाठी मी वैयक्तिकरित्या लक्ष देत आहे. भारतात अजूनही गुणवत्ता असून फॉर्म्युला-१चे चाहतेही खूप आहेत," असे करण अदानी यांनी सांगितले.

सध्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटची मालकी असलेला जेपी समूह आता अदानी ग्रूप विकत घेण्याच्या तयारीत आहे. "भारतात फॉर्म्युला-१ या खेळाला मिळणारी लोकप्रियता मोजकी असली तरी भारतीय चाहत्यांना हा खेळ पाहण्यासाठी अबूधाबी किंवा सिंगापूर यांसारख्या शहरांमध्ये जावे लागते. भारतात हा खेळ पुन्हा परतल्यास, भारताची जागतिक स्तरावरील पत सुधारण्यास मदत होईल तसेच चाहत्यांनाही फॉर्म्युला-१ खेळाचा थरार अनुभवण्याची संधी मिळेल," असेही ते म्हणाले. भारतात यापूर्वी २०११, २०१२ आणि २०१३ या वर्षी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर फॉर्म्युला-१ शर्यत रंगली होती. मात्र केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे पुन्हा ही स्पर्धा भारतात होऊ शकली नाही.

logo
marathi.freepressjournal.in