'सुलभ'चे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला
'सुलभ'चे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

नवी दिल्ली : सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी सीपीआर देऊन हृदयाचे ठोके परत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते ८० वर्षांचे होते.

दोन दिवसांपूर्वी पाटणा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. बिंदेश्वर पाठक यांनी १९७० मध्ये सुलभ इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली. सामाजिक कार्यकर्ते आणि सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी हाताने मैला सफाई करणाऱ्या कामगारांसाठी एक मोठी मोहीम सुरू केली होती. बिंदेश्वर पाठक यांच्या सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने देशात मोठ्या प्रमाणावर शौचालये बांधली आहेत.

बिंदेश्वर पाठक हे बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील रहिवासी होते. बिंदेश्वर पाठक यांना १९९९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००३ मध्ये त्यांचे नाव जगातील ५०० उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीत प्रसिद्ध झाले होते. बिंदेश्वर पाठक यांना एनर्जी ग्लोबसह इतर अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in