जम्मू : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात सशस्त्र दहशतवाद्यांसमवेत झालेल्या जोरदार चकमकीत लष्कराचे चार जवान मंगळवारी शहीद झाले असून, त्यामध्ये कॅप्टन पदावरील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालण्यासाठी अतिरिक्त कुमक तातडीने रवाना करण्यात आली आहे. दोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गेल्या तीन आठवड्यांत झालेली ही तिसरी चकमक आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कॅ. ब्रिजेश थापा, नाईक डी. राजेश, शिपाई विजयेंद्र आणि शिपाई अजय हे चार जण शहीद झाले आहेत.
गेल्याच आठवड्यात कथुआ जिल्ह्यातील मचेडी वनपट्ट्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. त्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर आता दोडा जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी चकमक उडाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष गटाने संयुक्तपणे देसा वनपट्ट्यातील धारी गोटे उरारबागी येथे शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी झालेल्या किरकोळ चकमकीनंतर दहशतवाद्यांनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॅप्टनच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री पुन्हा चकमक उडाली. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या कॅप्टनसह चार जवान उपचारादरम्यान शहीद झाले.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी आणि लष्करातील सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांनी या शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. लष्कर आणि पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच शोधमोहीम अधिक तीव्र केली असून त्यासाठी तेथे अधिक कुमकही पाठविण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना बडतर्फ करा - मेहबूबा मुफ्ती
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३२ महिन्यांत ५० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी मंगळवारी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केली असून, जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारसाठी जम्मू-काश्मीरमध्ये तरुण अधिकारी तोफेच्या तोंडी जात आहेत. दुर्दैवाने त्याची जबाबदारी निश्चित केली जात नाही. पोलीस महासंचालक आर. आर. स्वाइन यांना बडतर्फ केले पाहिजे, असे मेहबूबा यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. दोडामध्ये सोमवारी जे घडले ते निंदनीय आहे, आपण शूर जवान गमावले आहेत, पोलीस महासंचालक राजकीयदृष्ट्या काही गोष्टी निश्चित करण्यातच व्यस्त आहेत, असेही मेहबूबा म्हणाल्या.
दहशतवादाचा बीमोड करणार - राजनाथ
दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्करातील चार जवान शहीद झाल्याची घटना क्लेशदायक आहे. या प्रदेशातील दहशतवादाचा बीमोड करण्यास सुरक्षा दले बांधील आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
भाजपच्या चुकीच्या धोरणांचा जवानांवर आघात - राहुल
दोडा जिल्ह्यातील चकमकीत चार जवान शहीद झाल्यानंतर मंगळवारी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेत सातत्याने त्रुटी होत असल्याची जबाबदारी सरकारने घ्यावयास हवी व दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी. आपले जवान आणि त्यांचे कुटुंबीय भाजपच्या चुकीच्या धोरणांचा आघात सहन करीत आहेत, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. चकमकीत चार जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने आपल्याला खूप वेदना झाल्या आहेत. या घटनेचा निषेध करावा तितका थोडा आहे. काँग्रेस पक्ष भारतीय शूरवीरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.