

कांकेर: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा निकामी करताना झालेल्या भीषण स्फोटात चार पोलीस जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोक व्यक्त होत आहे. विशेषतः २९ वर्षीय कॉन्स्टेबल संजय गढपाले आणि ३५ वर्षीय कृष्णा कोमरा यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही जवानांचे लवकरच लग्न होणार होते, मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मृतांमधील चरामा येथील रहिवासी असलेल्या संजय गढपाले यांचा १५ एप्रिल रोजीच साखरपुडा झाला होता. जानेवारी २०२७ मध्ये त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. २०२२ मध्ये 'बस्तर फायटर्स'मध्ये भरती झालेले संजय नक्षलविरोधी मोहिमेत सक्रिय होते.
"माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, पण आता आमची स्वप्ने कोण पूर्ण करणार?" असा हृदयद्रावक प्रश्न त्यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. दुर्गकोंडल येथील रहिवासी असलेले कृष्णा कोमरा यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यात आली होती आणि पुढील वर्षी त्यांचे लग्न होणार होते. मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी आईला फोन करून विचारपूस केली होती, तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. कृष्णा यांचा धाकटा भाऊ भारतीय सैन्यात कार्यरत आहे.
या स्फोटात नारायणपूरचे परमानंद कोरराम (२९) आणि बीजापूरचे इन्स्पेक्टर सुखराम वट्टी (४०) यांनाही वीरमरण आले. ३१ मार्च रोजी राज्य नक्षलमुक्त घोषित केल्यानंतर झालेला हा पहिलाच मोठा स्फोट आहे.