कोलकाता : शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त संदेशखळीच्या काही भागांना पुन्हा एकदा निषेधांच्या कृतीने हादरवले. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शुक्रवारी सकाळी संतप्त स्थानिकांनी तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या मालमत्तेला आगी लावल्या. या नेत्यांवर महिलांचे लैंगिक शोषण आणि परिसरात जबरदस्तीने जमीन बळकावल्याचा आरोप आहे. स्थानिक तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या घरांचीही जमावाने तोडफोड केली. त्यांनी संदेशखळीच्या बेलमाजूर भागातील मासेमारी यार्डजवळील खळ्याच्या इमारतींना आग लावली आणि तृणमूलचे नेते शाहजहान शेख आणि त्यांचा भाऊ सिराज यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. पेटवण्यात आलेली मालमत्ता ही सिराजची असल्याचे उघड झाले.
निषेध करणाऱ्या या आंदोलकांनी सांगितले की, वर्षानुवर्षे पोलिसांनी काहीही केले नाही. म्हणूनच आम्ही आमची जमीन आणि सन्मान परत मिळवण्यासाठी सर्व काही करत आहोत.
दरम्यान, या ताज्या निषेधांनंतर पोलीस परिसरात दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी कुमार यांनी नदीकाठच्या समस्याग्रस्त भागात धाव घेतली आणि स्थानिकांशी संवाद साधला. तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. आम्ही कारवाई करू. आम्ही येथे पोलीस छावणी उभारू. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की कृपया कायदा हातात घेऊ नका, असे पोलीस महासंचालक कुमार स्थानिकांना म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना कुमार म्हणाले, पोलीस कठोर कारवाई करतील. आम्ही परिसरात कायद्याचे राज्य प्रस्थापित करू. तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असे सांगून ते म्हणाले की, पोलीस आणि प्रशासनाने हडप झालेल्या ग्रामस्थांच्या जमिनी परत करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. डीजीपी यांनी याआधी बुधवारी संदेशखळीला भेट देऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गुरुवारी कोलकाता येथे परतण्यापूर्वी त्यांनी रात्रभर तेथे मुक्काम केला. स्थानिक टीएमसी नेत्यांवर लैंगिक शोषण आणि बळजबरीने जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे संदेशखळीच्या काही भागात निषेध आणि जाळपोळ झाल्याच्या एका दिवसानंतर ताजी निदर्शने झाली.
मानवाधिकार आयोगाच्या पथकाची भेट
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सहा सदस्यीय पथक बुधवारी पश्चिम बंगालमधील अशांत संदेशखळी येथे गेले आणि तेथील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत तथ्ये जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांशी चर्चा केली. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील अनेक ग्रामस्थांनी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडप आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
सकाळी हे पथक संदेशखळी येथे पोहोचले. संदेशखळीमध्ये निरपराध आणि गरीब महिलांचा छळ आणि लैंगिक अत्याचार झाल्याच्या मीडियाच्या वृत्तांची आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.
भाजप महिला शिष्टमंडळाला रोखले
भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अशांत संदेशखळी येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखले. प. बंगाल भाजपचे दोन्ही सरचिटणीस लॉकेट चॅटर्जी आणि अग्निमित्र पॉल यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पथकाला पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशाचा हवाला देत रोखले. निषेधात्मक आदेशांचा हवाला देऊन आम्हाला संदेशखळीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सत्य लपवण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा पॉल यांनी केला.