१ जून पासून कारसह इतर वाहनांचा विमा महाग होणार

१ जून पासून कारसह इतर वाहनांचा विमा महाग होणार

एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. अशातच वाहनचालकांना धक्का देणारी बातमी आहे कारण त्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. नाही. हा बोजा कार किंवा बाइकच्या विम्याबाबत वाढणार आहे. वास्तविक, १ जून २०२२ पासून तुमच्या कारसह इतर वाहनांचा विमा महाग होणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियम दरात वाढ केली.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता कारच्या इंजिननुसार विमा काढण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या वाढीसंदर्भात रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०१९-२० या वर्षासाठी मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये यापूर्वी वाढ करण्यात आली होती. १ जून २०२२ पासून विमा प्रीमियमचे नवीन दर लागू होतील, असे सांगण्यात आले.

परिवहन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आता १,००० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी २,०९४ रुपये निश्चित प्रीमियम भरावा लागेल, जो २०१९-२०मध्ये २०७२ रुपये होता. याशिवाय १,००० सीसी ते १,५०० सीसी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम ३२२१ रुपयांवरून ३,४१६ रुपये करण्यात आला आहे. १,५०० सीसी वरील वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये ७,८९० रुपयांवरून ७,८९७ रुपयांपर्यंत किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार केवळ चारचाकी वाहनांसाठीच नाही तर दुचाकींसाठीही सरकारने थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमच्या दरात बदल केला आहे. अधिसूचनेनुसार, १ जून २०२२ पासून, १५० सीसी ते ३५० सीसी पर्यंतच्या बाइक्ससाठी प्रीमियम १,३६६ रुपये आकारला जाईल, तर ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम २,८०४ रुपये निश्चित करण्यात आला आहे..

कोरोनामुळे दोन वर्षे दर स्थिर

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून प्रीमियममध्ये कोणताही बदल झालेला नाही. सुधारित टीपी विमा प्रीमियम १ जूनपासून लागू होईल. यापूर्वी, हे दर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) अधिसूचित केले होते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने विमा नियामकाशी सल्लामसलत करून टीपी दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in