
नवी दिल्ली : लोकसभेत २६ जुलै रोजी मोदी सरकारच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून तीन दिवस घमासान चर्चा होणार आहे. या चर्चेत कॉँग्रेसतर्फे यापूर्वी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांचे नाव दिले होते. आता राहुल गांधी पुन्हा सभागृहात आल्याने, त्यांचेच भाषण व्हावे, असा आग्रह लोकसभा अध्यक्षांकडे धरण्यात येणार आहे. त्यामुळे अविश्वासवरील चर्चा वादळी होणार आहे.
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना सोमवारी सकाळी खासदारकी बहाल केली. संसदेच्या आवारात येताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राहुल यांनी लोकसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. कॉँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी मणिपूर हिंसाचारावर सरकारला लक्ष्य करतील. २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावर कामकाज रोखून धरले आहे. महागाई, बेरोजगारी व सीमेवर चीनची घुसखोरी या मुद्यांवर राहुल गांधी हे सरकारला कोंडीत पकडणार आहेत.
राहुल गांधी हे मोदी सरकारवर हल्ला करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात असतील, याची शक्यता कॉँग्रेस नेत्यांनी गृहित धरलेली नाही. ते गुरुवारी या चर्चेला उत्तर देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सभागृहात उपस्थित राहून आरोपांना प्रत्युत्तर देतील, अशी रणनीती भाजपने आखली आहे.
राहुल सभागृहात कोणते प्रश्न विचारतील, याची माहिती कॉँग्रेसने त्यांच्या वेबसाइटवर टाकली आहे. तुम्ही मणिपूरला कधी भेट देणार? तुम्ही अकार्यक्षम मुख्यमंत्र्याला कधी हटवणार? तुम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळाला कधी भेटणार? महिलांविरोधात गुन्हे घडत असताना तुमचे सरकार आंधळेपणाने का बसले आहे? शांतता प्रस्थापित करण्यात तुमचे डबल इंजिन सरकार निष्प्रभ का ठरले? असे प्रश्न राहुल विचारणार आहेत. हरियाणातील नूह येथील जातीय हिंसाचाराबाबत राहुल हे सरकारला जाब विचारणार आहेत. या भागातील मुस्लिमांना का चिरडून टाकले जात आहे, असे सवाल ते करतील.
भाजप सरकारला प्रचंड बहुमत असल्याने हा अविश्वास ठराव लोकसभेत मंजूर होणार नाही, याची खात्री कॉँग्रेसला आहे, मात्र मणिपूर व नूह येथील हिंसाचारामागे सत्ताधारी भाजपचा हात असल्याचे देशातील जनतेला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखवून दिले जाणार आहे, असे कॉँग्रेस सूत्रांनी सांगितले.