आठ कंपन्यांना नोटीस; दिशाभूल करणाऱ्या दाव्यांप्रकरणी FSSAI ची कारवाई

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करून उत्पादनांच्या पॅकेजिंग, लेबल आणि ब्रँडच्या नावांद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी आठ अन्न उत्पादक कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) रविवारी (१४ जून) ही कारवाई केली.
आठ कंपन्यांना नोटीस; दिशाभूल करणाऱ्या दाव्यांप्रकरणी FSSAI ची कारवाई
Published on

नवी दिल्ली : अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करून उत्पादनांच्या पॅकेजिंग, लेबल आणि ब्रँडच्या नावांद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी आठ अन्न उत्पादक कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) रविवारी (१४ जून) ही कारवाई केली. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे या सर्व कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आली असून प्राधिकरणाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या कारवाईची घोषणा केली आहे.

प्राधिकरणाने ज्या कंपन्यांना नोटीस बजावली आहे, त्यामध्ये इमामी हेल्दी अँड टेस्टी, हेल्थ एड, ट्रूव्ही, द हेल्दी फॅक्टरी, हेल्दी मास्टर, हेल्दी चॉईस, प्लान बी आणि न्यूहर्ब्स या ब्रँडचा समावेश आहे. या कंपन्यांनी आपल्या ब्रँडची नावे, व्यापारी नावे आणि उत्पादनांचे दावे याद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या कारवाईत कोलकाता येथील इमामी ग्रुपची खाद्यतेल कंपनी असलेल्या इमामी हेल्दी अँड टेस्टी या मोठ्या ब्रँडचाही समावेश आहे. या कंपनीचे व्यापारी नाव ग्राहकांची दिशाभूल करणारे असून ते एफएसएसएआयच्या नियमांचे थेट उल्लंघन करणारे असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in