

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांमधील अतिरिक्त फॅट (चरबी), साखर आणि मिठाच्या वाढत्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने' एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये हे घटक जास्त प्रमाणात असतील, त्यांच्या पाकिटाच्या पुढील भागावर लाल रंगाचा षटकोनी इशारा छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्राधिकरणाने ही माहिती दिली. या निर्णयामुळे ग्राहकांना आरोग्यासाठी घातक किंवा संवेदनशील असणारे अन्नपदार्थ ओळखणे सोपे होणार आहे. आयसीएमआर-एनआयएनच्या २०२४ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्या अन्नात समाविष्ट केलेले सॅच्युरेटेड फॅट, साखर किंवा मिठाचे प्रमाण ठरवून दिलेल्या मर्यादपेक्षा जास्त असेल, त्यावर जास्त चरबी, जास्त साखर किंवा जास्त मीठ असा लाल रंगाचा षटकोनी मार्क छापावा लागेल. हा इशारा ग्राहकांच्या स्पष्टपणे लक्षात यावा यासाठी पाकिटाच्या मागील बाजूस असलेल्या पोषण तक्त्यापेक्षा एका पॉइंटने मोठ्या फॉन्टमध्ये छापणे बंधनकारक असेल.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
पहिल्या टप्प्यात दोन किंवा अधिक घातक घटकांचे प्रमाण जास्त असलेल्या उत्पादनांवर इशारा दिला जाईल, दुसऱ्या टप्प्यात कोणत्याही एका घटकाचे प्रमाण जास्त असलेल्या उत्पादनांवरही इशारा लागू केला जाईल. तूप, खाद्यतेल, मीठ, साखर, गूळ आणि मध यांसारख्या नैसर्गिक किंवा एकाच घटकापासून बनणाऱ्या पदार्थांना या नियमातून वगळण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
'३एस अँड अवर हेल्थ सोसायटी' या संस्थेने पॅकबंद अन्नावर इशारा देणारे लेबल लावण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यावर १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या.जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने प्राधिनकरणाच्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सरकारला आपल्या देशातील नागरिक निरोगी राहावेत असे वाटत नाही का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला होता.
त्यानंतर प्राधिकरणाने हे प्रतिज्ञापत्र सादर करून सुधारित नियमावली लवकरात लवकर अधिसूचित केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. लहान मुले आणि आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींना योग्य अन्नपदार्थ निवडण्यास या निर्णयामुळे मोठी मदत होईल.