इंधन शुल्क हटविण्याची घोषणा ;इंडिगोचे भाडे ३०० ते १००० रुपयांनी स्वस्त होणार

एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) च्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर इंडिगोने गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये इंधन अधिभार लागू केला
इंधन शुल्क हटविण्याची घोषणा ;इंडिगोचे भाडे ३०० ते १००० रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीला इंडिगो विमान कंपनीने गुरुवारी इंधन शुल्क हटविण्याची घोषणा केली आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या मते, हा निर्णय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गासाठी ४ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील एक प्रमुख असलेल्या एअरलाईन्स इंडिगो कंपनीने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंडिगो एअरलाईन्सला इंधन अधिभार हटवण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा अधिभार आजपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर लागू झाला आहे. एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे.

एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) च्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाल्यानंतर इंडिगोने गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये इंधन अधिभार लागू केला होता. जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता. एअरलाईन्सच्या प्रवाशांना प्रवासाच्या अंतरानुसार, हा इंधन अधिभार भरावा लागत होता, परंतु आता त्यांची या शुल्कातून सुटका झाली आहे. आता इंधन अधिभार हटवल्यानंतर इंडिगो फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट स्वस्त होऊ शकते. उपलब्ध माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये इंधन अधिभार लागू करताना इंडिगोने सांगितले होते की, विमान प्रवासाच्या अंतरानुसार इंधन शुल्क ३०० ते १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, एटीएफच्या किमतींचा थेट परिणाम भाड्यांवर दिसून येतो.

logo
marathi.freepressjournal.in