Fuel Price Hike : पेट्रोल, डिझेल कडाडले; प्रत्येकी ३ रुपयांची दरवाढ

राज्य विधानसभा निवडणुकांमुळे रोखून धरण्यात आलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ आता प्रत्यक्षात आली आहे.
Fuel Price Hike : पेट्रोल, डिझेल कडाडले; प्रत्येकी ३ रुपयांची दरवाढ
Fuel Price Hike : पेट्रोल, डिझेल कडाडले; प्रत्येकी ३ रुपयांची दरवाढ(संग्रहित छायाचित्र FPJ)
Published on

नवी दिल्ली : राज्य विधानसभा निवडणुकांमुळे रोखून धरण्यात आलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ आता प्रत्यक्षात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली. गेल्या चार वर्षांतील ही पहिलीच मोठी दरवाढ असून इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या निर्णयामुळे इतर क्षेत्रातही सार्वत्रिक भाववाढ होण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारच्या मालाची तसेच भाजीपाल्याची वाहतूक आता महागणार असून त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडण्याची शक्यता आहे. या दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये, तर डिझेलचा दर ८७.६७ रुपयांवरून ९०.६७ रुपये प्रति लिटर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर 'होर्मुझची सामुद्रधुनी' या मुख्य तेल पुरवठा मार्गावर परिणाम झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. आज त्यापाठोपाठ दिल्लीतही किलोमागे दोन रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली.

केंद्र सरकारने निवडणुकांमुळे किमती स्थिर ठेवल्या होत्या, मात्र निवडणुका संपताच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल १०६.६८ रुपये आणि डिझेल ९३.१४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल १०८.७४ रुपये तर चेन्नईत १०३.६७ रुपये झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यात इंधन बचतीचे आवाहन करताना 'वर्क फ्रॉम होम' आणि प्रवास कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वाढत्या इंधन दराचा देशाच्या परकीय चलन साठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. खासगी तेल विक्रेत्या कंपन्यांनी यापूर्वीच किमती वाढवल्या होत्या. 'नायरा एनर्जी'ने पेट्रोलमध्ये ५ रुपये तर 'शेल'ने पेट्रोलमध्ये ७.४१ रुपयांची वाढ केली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मार्चमध्ये ६० रुपयांची वाढ झाली असली तरी, तेल कंपन्यांना अद्यापही प्रत्येक सिलिंडरवर ६७४ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

'इक्रा'च्या (आयसीआरए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती १०५ ते ११० डॉलर प्रति बॅरल असताना तेल कंपन्यांना दररोज सुमारे ५०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे ही दरवाढ पुरेशी नसून कच्च्या तेलाच्या किमती अशाच राहिल्यास पुन्हा दरवाढ होऊ शकते. एप्रिल २०२६ मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर घाऊक महागाईचा दर ८.३ टक्क्यांच्या उच्चांकावर असून इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि इतर क्षेत्रांतही महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बसचालक, वाहतूकदारांचा संताप

मुंबई : या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलने प्रति लिटर १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला असून डिझेल ९३ रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. खासगी बस चालक, टॅक्सी संघटना आणि मालवाहतूकदारांनी या दरवाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असून अनेक बुकिंग आधीच जुन्या दराने स्वीकारले असल्याने वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर कसा टाकायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. खासगी बस संघटनेचे हर्ष कोटक यांनी सांगितले की, सरकारच्या वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांमुळे भाडेवाढ केली नव्हती, मात्र आता हा तोटा सहन करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनीही इंधन दरवाढीचा रिक्षा, टॅक्सी आणि बससेवेवर मोठा परिणाम होणार असल्याचे नमूद केले.

सरकारने तातडीने डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मुंबई आणि दिल्लीमधील इंधन दरात मोठी तफावत असून मुंबईकरांना दिल्लीच्या तुलनेत पेट्रोलसाठी नऊ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल ९७.७७ रुपये तर डिझेल ९०.६७ रुपये असताना मुंबईत हे दर अनुक्रमे १०६.६४ आणि ९३.१४ रुपये इतके आहेत. केंद्र सरकार उत्पादन शुल्क समान लावत असले तरी राज्य सरकारचा व्हॅट आणि अतिरिक्त अधिभार यामुळे महाराष्ट्रात इंधनाचे दर देशात सर्वाधिक आहेत. दुसरीकडे, मान्सून पर्यटनाच्या तोंडावर ट्रॅव्हल पॅकेज महाग होणार असल्याने पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. इंधन दरातील या सातत्यपूर्ण वाढीमुळे सामान्यांच्या घरचे बजेट कोलमडले असून सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in