

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने, देशांतर्गत बाजारात दोन आठवड्यात चौथ्यांदा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपयांची, तर डिझेलच्या दरात २.७१ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी नागरिकांच्या खिशाला जाळ लावला असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच आता पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याने नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर मे महिन्याच्या मध्यापासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच सीएनजीही प्रति किलो ४ रुपयांनी महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांसोबतच नायरा एनर्जी, शेल आणि जिओ-बीपी या खासगी कंपन्यांनीही आपल्या दरांमध्ये वाढ केली आहे.
या लागोपाठच्या दरवाढीमुळे वाहतूक आणि दळणवळणाचा खर्च वाढणार असून, देशातील सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा बसणार आहेत. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई ३.४८ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर घाऊक महागाई ४२ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच ८.३ टक्क्यांवर गेली आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता. समुद्रातील तेल वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' मधील तणावामुळे फेब्रुवारीपासून कच्च्या तेलाचे दर ५० टक्क्यांहून अधिक वाढले होते. सोमवारी अमेरिका आणि इराण यांच्यात 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' मार्ग पुन्हा सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत तत्वतः सहमती झाल्याने ब्रेंट क्रूडचे (कच्चे तेल) दर ५ टक्क्यांनी घसरले. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या काही आठवड्यांत सोसलेले नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ सुरूच ठेवली आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर हिंदीत पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "'महागाई मानव' मोदींनी पुन्हा एकदा घाला घातला आहे. ते पेट्रोल आणि डिझेलचे दर हप्त्या-हप्त्यांमध्ये वाढवत आहेत, जेणेकरून जनतेला कळणारही नाही आणि त्यांचा खिसा हळूहळू कापला जाईल. ते पुढे म्हणाले, देशावर घोंघावणाऱ्या आर्थिक संकटाबाबत मी अनेक महिन्यांपासून चेतावणी देत होतो. परंतु, मोदीजी नेहमीप्रमाणे निवडणुकांमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ८ रुपयांची वाढ केली." ही दरवाढ अशीच सुरू राहील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख शहरातील नवे दर
गेल्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत झालेली ही चौथी दरवाढ असून, १५ मे पासून आतापर्यंत इंधनाच्या दरात प्रति लिटर सुमारे ७.५ रुपयांची वाढ झाली आहे. प्रमुख शहरांतील नवे दर (प्रति लिटर) मुंबई पेट्रोल १११.२१ रुपये, डिझेल ९७.८३ रुपये, पुणे/ठाणे (स्थानिक करांमुळे मुंबईच्या दराच्या आसपास), दिल्ली पेट्रोल १०२.१२ रुपये, डिझेल ९५.२० रुपये, कोलकाता पेट्रोल ११३.५१ रुपये, डिझेल ९९.८२ रुपये, चेन्नई पेट्रोल १०७.७७ रुपये, डिझेल ९९.५५ रुपये असे आहेत.
मोदी महागाईपुरुष - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख 'महागाईपुरुष मोदी' असा केला. राहुल गांधी म्हणाले, लोकांच्या खिशातून हळूच पैसे काढता यावेत म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर हप्त्याहप्त्याने वाढवले जात आहेत. निवडणुकांमध्ये केवळ आश्वासने द्यायची आणि निवडणुका संपताच जनतेच्या खिशावर दरोडा टाकायचा, हेच मोदींचे काम आहे.