जी-२० शिखर परिषदेला सुरुवात जगासमोरील आव्हानांवर नेत्यांची चर्चा

नेत्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्यास सुरुवात केली
जी-२० शिखर परिषदेला सुरुवात जगासमोरील आव्हानांवर नेत्यांची चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्थांच्या इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये जी-२० संघटनेच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली. जगातील प्रमुख देशांच्या या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्यास सुरुवात केली.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बदलती जागतिक भूराजकीय व्यवस्था, हवामान बदल, संक्रमण काळातील वित्तपुरवठा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, शाश्वत विकास उद्दिष्टांची त्वरित अंमलबजावणी, क्रिप्टोकरन्सीसाठी संरचना आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमधील सुधारणा आदी विषयांवर प्रामुख्याने उहापोह होत आहे. जगाच्या दक्षिण गोलार्धातील विकसनशील देशांच्या (ग्लोबल साऊथ) समस्यांना प्राधान्य देणे, हे या परिषदेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.

या शिखर परिषदेला जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्झ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा आदी नेते उपस्थित आहेत. याशिवाय संयुक्त राष्ट्रे (यूएन), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आफ्रिकन युनियन यांसारख्या अनेक आघाडीच्या जागतिक संस्थांचे प्रमुख देखील या दोन दिवसीय शिखर परिषदेला उपस्थित आहेत. भारताने बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती, स्पेन, सिंगापूर, ओमान, नायजेरिया आणि नेदरलँड्सच्या नेत्यांना या शिखर परिषदेसाठी पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. चीनचे अध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या परिषदेला उपस्थित नाहीत.

जी-२० संघटनेचे स्वरूप

जी-२० संघटनेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, चीन, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान आणि युरोपियन युनियन (ईयू) यांचा समावेश आहे. जी-२० संघटनेचे सदस्य देश जागतिक एकूण उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) सुमारे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश लोकांचे प्रतिनिधित्व करतात. या संघटनेचे फिरते अध्यक्षपद दरवर्षी एका सदस्य देशाला मिळते. यंदा ते भारताकडे आहे. गतवर्षी ते इंडोनेशियाकडे होते. पुढील वर्षी ते ब्राझीलकडे असणार आहे. भारताने १ डिसेंबर २०२२ रोजी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संघटनेशी संबंधित साधारण २०० बैठका आयोजित केल्या आहेत. त्यापैकी शनिवारी, रविवारी नवी दिल्लीत होत असलेली बैठक सर्वोच्च पातळीवरील आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' (जग एक कुटुंब आहे) हे यंदाच्या परिषदेचे ब्रीदवाक्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in