श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी गगनयानच्या क्रू एस्केप यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली. भविष्यातील मानवी मोहिमांदरम्यान काही अडचण उद्भवल्यास अंतराळवीरांना सुखरूप जमिनीवर परत आणण्यासाठी या यंत्रणेचे विशेष महत्त्व आहे.
चंद्र, मंगळ, सूर्य अशा खगोलीय पिंडांचा अभ्यास करण्यासाठी मानवविरहित यान यशस्वीरीत्या पाठवल्यानंतर आता इस्रो मानवी अंतराळ मोहिमा हाती घेणार आहे. गगनयान प्रकल्पाच्या अंतर्गत चंद्र आणि अंतराळात अन्य लक्ष्यांच्या दिशेने भारताचे अंतराळवीर पाठवले जाणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून विविध यंत्रणांची चाचणी घेणे सुरू आहे. त्यापैकी क्रू एस्केप सिस्टिमची शनिवारी चाचणी घेण्यात आली.
टेस्ट व्हेईकल - डेमोन्स्ट्रेशन -१ (टीव्ही-डी १) अग्निबाणाच्या मदतीने क्रू मोड्यूलचे शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीहरिकोटा येथील तळावरून प्रक्षेपण करण्यात आले. यानाल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १७ किमी अंतरावर पाठवून त्यात अभ्यासासाठी अडचण आल्यासारखी स्थिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर मिशन अबॉर्ट (रद्द) करून अंतराळवीरांची कुपी पॅराशुट्सच्या मदतीने पूर्वेकडील किनाऱ्यापासून साधारण १० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात उतरवण्यात आली. तेथून नौदलाच्या नौकांद्वारे ही कुपी परत किनाऱ्यावर आणण्यात आली. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान काही अडचण आल्यास अंतराळवीरांना सुखरूप परत आणण्याची ही रंगीत तालीम होती. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले.
मॉनिटरिंग व्यवस्थेतील बिघाडाने विलंब
टीव्ही-डी १ अग्निबाणाचे प्रक्षेपण शनिवारी सकाळी ८ वाजता करण्याचे मूळ नियोजन होते. त्यानुसार इस्रोने तयारी पूर्ण करून काऊंटडाऊन सुरू केले, पण प्रक्षेपणाला केवळ ४ सेकंद उरले असताना शास्त्रज्ञांच्या समोरील संगणक स्क्रीनवर होल्ड (थांबा) असा संदेश झळकला. मॉनिटरिंग यंत्रणेतील किंचित बिघाडामुळे तसे घडले होते. शास्त्रज्ञांनी लगेचच ती त्रुटी दूर केली. त्यानंतर पुन्हा सर्व यंत्रणा तपासून प्रक्षेपण यशस्वी झाले. मात्र, या तात्पुरत्या बिघाडामुळे सुरुवातीला प्रक्षेपणाची वेळ ३० मिनिटांनी आणि पुन्हा एकदा १५ मिनिटांनी पुढे ढकलण्यात आली.
पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टिमची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) जाहीर केले की, या यशस्वी चाचणीमुळे गगनयान प्रकल्पांतर्गत मानवी अंतराळ मोहिमा हाती घेण्याच्या ध्येयाच्या आपण एक पायरी जवळ पोहोचलो आहोत. इस्रोच्या शास्त्रज्ञांना माझ्याकडून त्यासाठी सुयश चिंतितो.