आरोग्य केंद्रात नर्सवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात

छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेच्या मुद्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे.
आरोग्य केंद्रात नर्सवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात

छत्तीसगडच्या महेंद्रगड जिल्ह्यातील छिपछिपी या गावातील आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चौघांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यातील एक आरोप अल्पवयीन आहे. चौथा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेच्या मुद्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी महेंद्रगड जिल्ह्यातील छिपछिपी या गावातील आरोग्य केंद्रात पीडित नर्स एकटीच काम करत होती. हीच संधी साधून आरोपींनी दुपारी ३ च्या सुमारास आरोग्य केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी पीडित नर्सला बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रण केले असून, याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी पीडित नर्सला दिली आहे. या घटनेनंतर पीडित नर्सने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून भूपेश बघेल यांच्या सरकारविरोधात मोर्चा काढला, तर महेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार विनय जैस्वाल यांनी भाजप या घटनेचे राजकारण करत असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. छत्तीसगड सरकारने आम्हाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही काम बंद करू, असा इशाराही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in