गंगवाल कुटुंब समभाग विक्रीतून ३७३५ कोटी उभारणार

टप्प्याटप्प्याने आमचे कुटुंबीय या कंपनीतील हिस्सा कमी करणार आहेत, असे राकेश गंगवाल यांनीसांगितले होते
गंगवाल कुटुंब समभाग विक्रीतून ३७३५ कोटी उभारणार
Published on

नवी दिल्ली : भारतातील नामवंत कंपनी ‘इंडिगो’ इंटरग्लोब एव्हिएशनचे गंगवाल कुटुंबीय आपला कंपनीतील हिस्सा विकून ३७३५ कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक राकेश गंगवाल हे आपला हिस्सा कंपनीतून कमी करणार आहेत.

सप्टेंबर २०२२ मध्ये गंगवाल कुटुंबीयांनी २.८ टक्के समभाग विकून २ हजार कोटी रुपये उभारले होते. त्यावेळी त्यांनी ४ टक्के समभाग विकले होते, तर फेब्रुवारीत ४ टक्के समभाग विकून २९०० कोटी मिळवले.

फेब्रुवारी २०२२ मध्ये इंटरग्लोब एव्हिएशनच्या संचालक मंडळावरून राकेश गंगवाल हे पायउतार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडे या कंपनीचे २९.७२ टक्के समभाग आहेत. टप्प्याटप्प्याने आमचे कुटुंबीय या कंपनीतील हिस्सा कमी करणार आहेत, असे राकेश गंगवाल यांनी यापूर्वी सांगितले होते.

कंपनीच्या समभागाची सध्या किंमत २५४९ रुपये आहे. तरी विक्रीसाठी समभागाची किंमत २४०० रुपये प्रति समभाग ठेवली आहे. गुंतवणूकदारांना ५.८ टक्के सवलत देऊ केली आहे.

इंटरग्लोब एव्हिएशनचे भागभांडवल ९८,३१३ कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या समभागाची किंमत २२ टक्क्यांनी वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in