उज्जैन : भंगार गोळा करणाऱ्या महिलेवर मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बलात्कार करण्यात आला त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या तीन ते चार संशयितांची ओळख पटली असून त्यांना पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, असे शुक्रवारी एका अधिकाऱ्याने सांगितले.
उज्जैनच्या आगर नाका परिसरात एका इसमाने भंगार गोळा करणाऱ्या महिलेला जबरदस्तीने मद्य प्राशन करावयास भाग पाडले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आणि त्यानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
बलात्काराच्या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करणाऱ्या तीन ते चार संशयितांची ओळख पटली आहे. हे सर्वजण विविध ठिकाणी असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. पीडितेची प्रकृती स्थिर आहे, मुख्य आरोपी लोकेश याने त्या महिलेला विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. बुधवारी लोकेशने या महिलेला जबरदस्तीने मद्य प्राशन करण्यास भाग पाडले आणि तिच्यावर बलात्कार केला.
लोकेश तिच्यावर बलात्कार करीत असताना काहीजण तेथून जात होते, मात्र त्यांनी पीडितेची मदत करण्याऐवजी त्या घटनेचे चित्रीकरण केले. या घटनेनंतर लोकेश तेथून पसार झाला. महिलेने तक्रार केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.