गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य झाले त्रस्त

गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य झाले त्रस्त

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये सातत्याने दरवाढ सुरूच आहे. गुरुवारी एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली. आता घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ३.५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशात एलपीजी सिलिंडरची किंमत १००५ रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य आधीच होरपळत असताना या दरवाढीमुळे त्यांच्यासमोरील अडचणीत आणखी भर पडणार आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आता २३५४ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसाठी नवीन दर अनुक्रमे २४५४ रुपये, २३०६ रुपये आणि २५०७ रुपये झाले आहेत. हातगाडी, ठेला, लहान हॉटेल, अशा किरकोळ व्यावसायिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

यापूर्वी ७ मे रोजी झाली होती दरवाढ

यापूर्वी, मे २०२२ रोजी देशात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतरही मे महिन्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही तेव्हा आठ रुपयांनी वाढवण्यात आली होती.

घरगुती सिलिंडरचे नवे दर (१४.२ किलोग्राम)

दिल्ली - १००३ रुपये

कोलकाता - १०२९ रुपये

मुंबई - १००२.५० रुपये

चेन्नई- १०१८.५० रुपये

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in