५०० रुपयांत गॅस सिलिंडर, महिलांना दरवर्षी १० हजार रुपये राजस्थानात काँग्रेसची निवडणुकीआधी आश्वासने

प्रियांका गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी झुंझुनू येथील काँग्रेसच्या रॅलीत ही आश्वासने दिली
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, महिलांना दरवर्षी १० हजार रुपये राजस्थानात काँग्रेसची निवडणुकीआधी आश्वासने
ANI

जयपूर : पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, आता काँग्रेसने राजस्थानात विविध आश्वासनांची खैरात केली आहे. राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास, महिलांना दरवर्षी १० हजार रुपये दिले जातील. त्याचबरोबर १ कोटी ५ लाख कुटुंबांना अवघ्या ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिला जाणार आहे.प्रियांका गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी झुंझुनू येथील काँग्रेसच्या रॅलीत ही आश्वासने दिली.

भाजप सरकारवर हल्लाबोल करत प्रियांका गांधी म्हणाल्या की, “या सरकारकडे दूरदृष्टी नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. सध्या कुठेही रोजगार निर्मिती नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या रोजगार निर्माण करत असत, पण या सरकारने त्या आपल्या बड्या उद्योगपती मित्रांना विकल्या. महिला आरक्षणाबाबत मोदी सरकारने पोकळ आश्वासन दिले आहे. काँग्रेसने सर्वप्रथम महिलांना पंचायतींमध्ये आरक्षण दिले. त्यांनी कायदा आणला, पण आरक्षण कधी मिळेल, याची कल्पना नाही. मोदींनी स्वत:साठी १६ हजार कोटी रुपयांची दोन विमाने विकत घेतली. गरज नसतानाही, संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली, मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत.”

प्रियांका गांधींच्या सभेत भाजपमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ममता शर्मा यांनी मंचावर पोहोचून काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. याशिवाय किशनगडमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले विकास चौधरी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासोबतच ढोलपूरच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in