
इंफाळ : पंतप्रधानांचा संभाव्य दौरा दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता. न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असे म्हणतात, त्याचप्रमाणे मणिपूरच्या लोकांनाही बऱ्याच काळापासून पंतप्रधानांच्या भेटीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विलंबाबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्याला कोणत्याही ध्येयाचा शेवट मानू नये, तर राज्यात शांतता, न्याय, सलोखा आणि लोकशाही परत आणण्याच्या दीर्घ प्रवासाची ही केवळ सुरुवात मानली पाहिजे. पंतप्रधान आल्यावर त्यांनी गेल्या २ वर्षात न आल्याबद्दल प्रथम मणिपूरच्या लोकांची माफी मागावी. राज्यात अजूनही अनेक आव्हाने शिल्लक आहेत, असे गोगोई म्हणाले.
मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेघर झाले आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या 'एसआयटी'ने १० सप्टेंबर रोजी पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख आणि भारतीय सहकाऱ्यांमधील कथित संबंध उघड केले आहेत. त्यांचा तपास अहवाल अद्याप सादर झालेला नाही. आसाम काँग्रेस भाजप सरकारचे घोटाळे उघड करत राहील, असे ते म्हणाले.