बिल गेट्सला मागे टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात जवळपास दुप्पट झाली आहे
बिल गेट्सला मागे टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या दहामध्ये दोन भारतीय उद्योगपतींनी स्थान मिळवले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अलीकडेच त्यांनी संपत्तीच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. बिल गेट्स हे बर्याच काळापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. आता अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांच्या पुढे जेफ बेझोस, बर्नार्ड अॅनाल्ट आणि इलॉन मस्क हे तीन अब्जाधीश आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी दहाव्या स्थानावर आहेत.

आकडेवारीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात जवळपास दुप्पट झाली आहे. त्याच्या संपत्तीची झपाट्याने होणारी वाढ पाहता ते येत्या काही दिवसांत जगातील पहिल्या तीन अब्जाधीशांच्या क्रमवारीतही स्थान मिळवू शकतात. २०२१ च्या सुरुवातीच्या महिन्यांत गौतम अदानी यांची संपत्ती ५५-६० अब्ज डॉलर्सच्या जवळपास होती, जी सध्या वाढून सुमारे ११५.५ अब्ज डॉलर्स (९.२ लाख कोटी रुपये) झाली आहे.

आता फक्त बेझोस, अॅनाल्ट आणि मस्क अदानींच्या पुढे

जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर करणाऱ्या फोर्ब्स मासिकाच्या क्रमवारीनुसार, गौतम अदानी सध्या जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश आहेत. अलीकडेच त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता गौतम अदानी यांच्या पुढे फक्त तीन अब्जाधीश आहेत - जेफ बेझोस, बर्नार्ड अॅनाल्ट आणि इलॉन मस्क. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती सुमारे १३९.५ अब्ज डॉलर्स आहे. अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अॅनाल्टची संपत्ती सुमारे १४८.५ अब्ज डॉलर्स आहे, तर इलॉन मस्क २३०.८ अब्ज डॉलर्स संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

अदानी यांनी बिल गेट्सला

असे टाकले मागे

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली की, ते या महिन्यात बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला त्यांच्या एकूण संपत्तीपैकी २० अब्ज डॉलर्स देणगी देत ​​आहेत. त्यामुळे त्याच्या संपत्तीत घट झाली होती. गेट्स यांचा वरील निर्णय झाला असताना गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये अलीकडच्या काळात सातत्याने वाढ होत आहे. त्यांनी बिल गेट्स यांना मागे टाकून अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. दुसरीकडे, भारतीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत ८९.९ अब्ज डॉलर्सच्या (७.१८ लाख कोटी रु.) संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in