भाजप खासदार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तगंभीरने शनिवारी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. मला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना केली आहे, जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन, असे गंभीरने पोस्टमध्ये म्हटले आहे.
गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार आहे. जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार मानतो, जय हिंद! असेही गंभीरने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
गौतम गंभीरने २२ मार्च २०१९ रोजी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मग त्याला लोकसभेचं तिकीट मिळालं आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने अरविंदर सिंग लवली यांचा तीन लाख ९१ हजार मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत गंभीरला सुमारे सात लाख मते मिळाली होती. या विजयानंतर गंभीरने अनेकदा सोशल मीडियाद्वारे आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसवर निशाणा साधला. तेव्हा गंभीर राजकीय खेळपट्टीवरही दीर्घ खेळी खेळणार असल्याचे मानले जात होते. मात्र पाच वर्षांतच गंभीरचा राजकारणातून भ्रमनिरास झाल्याचे दिसते.
क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आगामी हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. IPL 2024 मध्ये, गंभीर शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्ससाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये गंभीरची KKR चा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१४ आणि २०१६ मध्ये गंभीरच्याच नेतृत्वाखाली कोलकाताचा आयपीएल चॅम्पियन बनला होता. आता एक मार्गदर्शक म्हणून गंभीर केकेआरला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवण्यास सज्ज आहे. IPL संपल्यानंतर गंभीर पुन्हा एकदा क्रिकेट समालोचन करताना दिसेन.