
अनुवंशिक कर्करोगाचा धोका कितपत आहे, हे ओळखणे आता शक्य होणार आहे. १८ वर्षे वयानंतरही प्रोएक्टिव्ह अनुवांशिक चाचणी करणे शक्य असून आता कॅन्सर बाबतचा धोका समजणे सोपे होणार आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलनंतर आता उपनगरातील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ही चाचणी आनुवंशिक कर्करोग क्लिनिकमध्ये उपलब्ध असेल, ज्याच्या लॉन्चची घोषणा रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अनिल अंबानी यांनी रविवारी केली.
देशातील एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी १० टक्के कर्करोग आनुवंशिक कर्करोगाचे आहेत. रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री यांनी सांगितले की, सर्वच लोकांना जनुकीय कर्करोग होत नाही, हे खरे आहे. तरीही अशा व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो. कर्करोग झालेल्या किंवा झालेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पूर्वी कर्करोग झालेला असेल तर या अनुवांशिक धोक्याची चाचणी घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. आता हॉस्पिटलमधील आनुवंशिक कॅन्सर क्लिनिकमध्ये ‘जेनेटिक टेस्ट’द्वारे हा धोका ओळखता येणार आहे. या चाचणीद्वारे, एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेने होणाऱ्या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणे शक्य होणार आहे
समुपदेशन होणार
मॉलिक्युलर पॅथॉलॉजीच्या सल्लागार डॉ. अमृत कौर यांनी सांगितले की, कर्करोग ही गोष्टच मुळी नागरिकांसाठी चिंतेची बाब असते. त्यामुळे या चाचण्या करण्यापूर्वी लोकांचे समुपदेशन केले जाणार आहे. कारण या चाचण्यांमुळे कर्करोगाचा धोका समोर आला तर ती व्यक्ती व कुटुंबीय अस्वस्थ होऊ शकतात त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी कोणती उपाय योजना करावी लागेल हे ठरवण्यासाठी समुपदेशन हा पर्याय सध्या आम्ही वापरत आहोत. नकारात्मक जनुक परिणाम सर्व चिंता संपवतो. चाचणीमध्ये ओळखल्या गेलेल्या उत्परिवर्तनाच्या प्रकारावर अवलंबून, ऑन्कोलॉजिस्ट धोका कमी करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करता येऊ शकतो.