"...अन्यथा तुमचे पक्षही फोडतील" म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या मित्रपक्षांना दिला 'हे' पद मिळवण्याचा सल्ला

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ(एनडीए) च्या नवनिर्वाचित खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत नितीश कुमारांसह चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ(एनडीए) च्या नवनिर्वाचित खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, असे भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी NDA च्या बैठकीत सांगितले. पण, ही बैठक सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एनडीएचे मित्रपक्ष तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांना सोशल मीडियाद्वारे सल्ला दिला.

"भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना: सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा, नाहीतर ते तुमचे पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील", असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. "नव्यानेच 'एनडीए' ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच", असे आदित्य ठाकरे यांनी एक्सवर लिहिले. त्यासोबत टीडीपी आणि जेडीयूच्या अधिकृत अकाउंट्सना टॅग देखील केले.

मी सदैव पंतप्रधानांच्या पाठीशी

दरम्यान, या बैठकीत बोलताना, "आमचा पक्ष, जनता दल (युनायटेड), भारताच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतो. गेली १० वर्षे ते पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होतील ही आनंदाची बाब आहे. त्यांनी देशाची सेवा केली असून, जे काही शिल्लक आहे ते यावेळी ते पूर्ण करणार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत राहू" असे बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार म्हणाले. "विरोधक गटाने देशासाठी काहीही योगदान दिलेले नाही... मी सदैव पंतप्रधानांच्या पाठीशी उभा राहीन." असेही कुमार यांनी म्हटले.

नायडूंचाही मोदींवर कौतुकाचा वर्षाव

टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. “मी अनेक सरकारे पाहिली आहेत. आपण सध्या खूप प्रेरणादायी काळात आहोत. नरेंद्र मोदींकडे दूरदृष्टी आहे, त्यांची अंमलबजावणी अतिशय परिपूर्ण आहे. ते आपली सर्व धोरणे खऱ्या भावनेने राबवत आहेत. आज भारताकडे योग्य नेता आहे - तो म्हणजे नरेंद्र मोदी. भारतासाठी ही खूप चांगली संधी आहे, जर आपण ती आता गमावली तर कायमची गमावू. मोदीजींनी गेल्या १० वर्षात खूप मोठी उंची गाठली आहे. मोदीजींच्या समर्पित दृष्टिकोनाने देशाला ग्लोबल पॉवरहाऊसमध्ये बदलले आहे. याचे संपूर्ण श्रेय मी मोदीजींना देतो,” असे नायडू म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in