दिल्लीच्या गाझीपूरमधून ‘लष्कर’चा संशयित दहशतवादी अटकेत

दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने गाझीपूर परिसरातून लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.
दिल्लीच्या गाझीपूरमधून ‘लष्कर’चा संशयित दहशतवादी अटकेत
दिल्लीच्या गाझीपूरमधून ‘लष्कर’चा संशयित दहशतवादी अटकेत
Published on

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने गाझीपूर परिसरातून लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शब्बीर अहमद लोन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो लष्कर-ए-तोयबाचा ‘स्लीपर सेल’ सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याने दिल्लीतील विविध भागात देशविरोधी पोस्टर्स लावले होते, असा त्याच्यावर आरोप आहे.

‘आयएसआय’शी संबंध

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हे संपूर्ण मॉड्यूल पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून चालवले जात होते. झडतीदरम्यान आरोपीकडे भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचे चलन सापडले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

शब्बीर अहमद लोन, ज्याला ‘राजा’ किंवा ‘काश्मिरी’ या नावानेही ओळखले जाते, तो मूळचा श्रीनगरचा रहिवासी आहे. त्याचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. यापूर्वीही २००७ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला एके-४७ रायफल आणि ग्रेनेड्ससह अटक केली होती. तो २०१८ पर्यंत दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शब्बीरचे संबंध हाफिज सईद आणि झाकी-उर-रहमान लखवी यांच्याशी आहेत. त्याने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत असून, दिल्लीत त्याचे इतर काही साथीदार सक्रिय आहेत का, याचा तपास केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in