धक्कादायक! भोपाळमधील बेकायदेशीर बालगृहातून 26 मुली बेपत्ता; धर्मांतराचा संशय, शिवराज चौहान म्हणाले...

धक्कादायक! भोपाळमधील बेकायदेशीर बालगृहातून 26 मुली बेपत्ता; धर्मांतराचा संशय, शिवराज चौहान म्हणाले...
Published on

मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये बेकायदेशीर चालवण्यात येणाऱ्या बालगृहातून 26 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींचा ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न सुरु होता, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. या मुली गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या सीहोर, रायसेन, छिंदवाडा, बालाघार या भागातील असल्याचे सांगितले जात आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी बालगृह संचालकांवर गुन्हा दाखल केला असून मुख्य सचिव वीरा राणा यांना सात दिवसांत चौकशी पूर्णकरुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी भोपाळजवळील परवलिया येथील आंचल बालगृहाचा अचानक दौरा केला. यावेळी त्यांनी तेथील रजिस्टर तपासून पाहिले. त्यात 68 मुलींची नोंद होती. मात्र, त्यापैकी 26 मुली बेपत्ता होत्या. त्यांनी त्याबाबत चौकशी केल्यावर बालगृहाचे संचालक अनिल मॅथ्यूकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगृहातील अन्य मुलींचा जबाब नोंदवला जात आहे. त्यांच्या जबाबाच्या आधारावर पुढील करावाई केली जाईल. आतापर्यंत केलेल्या चौकशीत मुलींसोबत कुठल्याही प्रकारचे लैंगिक आणि शारिरीक शोषण झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सर्व स्तरावर चौकशी केली जात आहे. हे बालगृह बेकायदेशीररित्या चालवले जात होते, असे सिन्हा यांनी सांगितले.

काँग्रेसने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा-जेव्हा भाजपचे सरकार येते, अशा प्रकारचे बेकायदेशीर बालगृह मोठ्या प्रमाणावर फोफावतात. येथे धर्मांतरासोबतच मानवी तस्करीचा देखील प्रकार घडतो. भाजप धर्माच्या नावाने राजकारण करते. मात्र, त्यांच्याच काळात असे प्रकार घडतात. हे लाजिरवाणे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in