सनातन धर्मावरील हल्लेखोरांना सोदाहरण प्रत्युत्तर द्या ;मोदींचा मंत्र्यांना आदेश
नवी दिल्ली: सनातन धर्मावर विखारी टीका करणाऱ्या हल्लेखोरांना सत्य उदाहरणांच्या सहाय्याने चोख प्रत्युत्तर द्या, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. तामिळनाडुच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुंनी टिकेचे मोहोळ उठले आहे.
पंतप्रधानांनी जी-२० शिखर संमेलनाच्या आधी मंत्रिमंडळळाशी संवाद साधतांना हा आदेश दिला आहे. तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला केवळ विरोध करुन चालणार नाही तर तो समूळ नष्ट केला पाहिजे, असे विधान नुकतेच केले होते. त्यांच्या या शेऱ्याला देशातील सर्व थरातून कडाडून विरोध झाला आणि एक नवा वाद उदयास आला. विशेषकरुन भाजप नेते आणि धर्मगुरुंनी या विधानावर कडाडून टीका केली आहे. भाजपने डीएमके नेत्याने माफी मागावी अशी मागणी केली आहे. सर्वत्र कडाडून टिका होत असतांना उदयनिधी यांनी आपण हे पुन्हा पुन्हा म्हणू असे सांगत आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. कारण आपण कुणा एका समाजाला उद्देशून हे म्हटलेच नाही असा उदयनिधी यांचा दावा आहे. दरम्यान उदयनिधीच्या विधानाचे मूळ इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत असल्याचा तर्क भाजपने लावला आहे. मुंबईतील बैठकीत या बाबतच्या अजेंड्यावर चर्चा झाल्याचे भाजपने म्हटले आहे.