५ वर्षांतील एन्काऊंटरची माहिती द्या!

सुप्रीम कोर्टाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश
५ वर्षांतील एन्काऊंटरची माहिती द्या!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मोठे पाऊल उचलले आहे. २०१७ पासून आतापर्यंत उत्तर प्रदेशात झालेल्या १८३ एन्काऊंटरची माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

अतिकची बहीण आएशा नुरीच्या याचिकेवर नोटीस पाठवून उत्तर प्रदेश सरकारकडे उत्तर मागितले आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्या. एस. रवींद्र भट्ट यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकारने १८३ एन्काऊंटरची माहिती द्यावी. तसेच चार आठवड्यांत स्थितीदर्शक अहवाल द्यावा. आम्ही तपासासाठी नाही, पण कोणतीही यंत्रणा अस्तित्वात आहे का? हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुरुंगात व न्यायालयीन कोठडीत असताना अशा घटना का घडत आहेत? उत्तर प्रदेश नव्हे तर देशातील अनेक राज्यांतील पोलिसांमध्ये हा प्रकार आहे. दोघांना पोलिसांनी घेरलेले असताना ही हत्या कशी झाली, असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला.

या हत्याकांडाचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशी याचिका विशाल तिवारी यांनी केली होती. त्यावर उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, अतिक व अश्रफ हे कुख्यात गँगस्टर होते. अतिकच्या विरोधात १०० हून अधिक गुन्हे होते. या हत्येचा तपास करायला माजी न्या. अरविंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली न्यायिक आयोग नेमला आहे. तसेच एसआयटीही स्थापन केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in