केळी द्या अन् तेल घ्या! भारत-रशिया व्यापारी संबंधांमधील नवीन ट्रेंड

भारताची रशियाकडून खनिज तेलाची आयात वाढली असून रशिया भारताकडून मोठ्या प्रमाणावर केळी विकत घेऊ लागला आहे.
केळी द्या अन् तेल घ्या! भारत-रशिया व्यापारी संबंधांमधील नवीन ट्रेंड

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत युक्रेन-रशिया युद्ध आणि हमास-इस्रायल युद्धामुळे जागतिक व्यापारावर बरेच परिणाम झाले आहेत. परिणामी, भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंधही नवीन वळणावर पोहोचले आहेत. त्यातील ताजा ट्रेंड असा की, भारताची रशियाकडून खनिज तेलाची आयात वाढली असून रशिया भारताकडून मोठ्या प्रमाणावर केळी विकत घेऊ लागला आहे.

दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यातच रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि जागतिक व्यापाराची घडण बदलू लागली. रशिया आणि युक्रेन हे जागतिक बाजारात खनिज तेल, नैसर्गिक वायू, गहू, मका, सूर्यफूल तेल आदी जिन्नसांचे मुख्य पुरवठादार होते. युद्धाने त्यावर परिणाम झाला. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादून अनेक देशांना रशियाशी व्यापार करण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे जगाने अन्य पर्यांयांचा विचार सुरू केला. युरोपने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याने रशियाने भारताला अधिक प्रमाणात तेल निर्यात करण्यास सुरुवात केली. २०२३ या वर्षांत भारताने रशियन तेलाची विक्रमी आयात केली.

इक्वेडोर हा दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिम किनाऱ्यावर वसलेला लहानसा देश. विषुववृत्तीय हवामान असल्याने तेथे केळ्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. आजवर त्यातील २० ते २५ टक्के केळी रशियाला निर्यात होत होती. त्या बदल्यात रशिया इक्वेडोरला शस्त्रास्त्रे पुरवत होता. आता अमेरिकेने दबाव टाकून इक्वेडोरचा रशियाकडून होणारा शस्त्रपुरवठा बंद पाडला. त्याऐवजी खुद्द अमेरिकाच इक्वेडोरला आपली शस्त्रे विकू लागला. त्यामुळे रशियानेही इक्वेडोरने पुरवलेल्या केळ्यांमध्ये कीड असल्याचे कारण देत तेथून होणारी आयात रोखली आहे. या बदललेल्या समीकरणामुळे रशियाने भारताकडून मोठ्या प्रमाणावर केळ्यांची खरेदी सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात भारतातून रशियाला केळ्यांची पहिली मोठी खेप रवाना झाली. फेब्रुवारीत दुसऱ्या हप्त्यातील कंटेनर रवाना होणार आहेत. याशिवाय रशिया भारताकडून पपई, अननस, पेरू आणि आंबे या फळांचीही मोठी आयात करण्यास उत्सुक आहे.

रशिया-भारत व्यापाराचे बदलते स्वरूप

भारत आणि रशिया यांचे संबंध सोव्हिएत काळापासून भक्कम पायावर उभे आहेत. काळानुरूप त्यात अनेक स्थित्यंतरे झाली असली तरी त्यांचा मूळ ढाचा मजबूत आहे. रशियाने आजवर भारताला अनेक क्षेत्रांत मदत केली आहे. त्यात धरणबांधणी, पोलाद, खते यांचे कारखाने, अंतराळ संशोधन, अणुऊर्जा आदी क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश होतो. संरक्षण क्षेत्रात तर रशिया हा गेली अनेक वर्षे भारताचा प्रमुख आधारस्तंभ राहिला आहे. आजही भारतीय सेनादलांकडील ६० टक्क्यांहून अधिक शस्त्रास्त्रे रशियन बनावटीची आहेत. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर त्यात काहीसा बदल होत गेला. शस्त्रास्त्रांसाठी भारत हळूहळू इस्रायल, युरोप आणि अमेरिकेकडे वळू लागला. आता रशिया भारताकडून केळी, पपई, अननस, पेरू आणि आंबे खरेदी करू लागला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in