

गोव्यातील ‘रोमिओ लेन’ नाइटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथ्रा देशातून पळून गेले. अग्निशमन दल आगीत अडकलेल्यांना मदत करण्यात आणि आग विझवण्यात गुंतलेली असताना, पोलिसांकडे अद्याप गुन्ह्याची नोंदही नसताना दोघेही थेट थायलंडच्या फुकेतमध्ये पोहोचले. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असताना केंद्राने ‘पासपोर्ट कायद्या’चा वापर करून लुथ्रा बंधूंना देशाबाहेरच सापळ्यात अडकवले आणि आता थायलंड पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
केंद्राची रणनीती : पासपोर्ट कायदा, कलम १०A + CBI ची ब्लू कॉर्नर नोटीस
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्राने पासपोर्ट कायदा, कलम १०A अंतर्गत सौरभ आणि गौरव यांचे पासपोर्ट रद्द (passport suspended) केले. या कलमानुसार, संबंधित व्यक्तींच्या प्रवासावर तात्काळ मर्यादा घालण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना मिळतो. त्याचवेळी CBI ने दोघांविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली-ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा शोध आणि हालचालींवर नियंत्रण आणणे सुलभ झाले. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे थायलंडमध्ये त्यांचा मुक्काम बेकायदेशीर ठरला आणि फुकेतहून पुढचा प्रवास देखील ते करू शकणार नव्हते. कायदेशीर घेराबंदी अधिक घट्ट झाली. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवर थायलंड पोलिसांनी दोघांना तातडीने ताब्यात घेतले. आता भारतीय पथक त्यांना देशात परत आणण्यासाठी थायलंडकडे रवाना झाले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी थायलंडच्या सरकारच्या त्वरित सहकार्याचे कौतुक केले आहे.
लवकरच भारतात आणणार
थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर लुथ्रा बंधूंचे पासपोर्ट हातात घेतलेले काही फोटो समोर आले आहेत. ताब्यानंतर २४ तासांच्या आत दोघांना भारतात डिपोर्ट केले जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांची टीम थायलंडकडे रवाना झाली आहे.
गुन्हा नोंदण्याआधीच थायलंडचे तिकीट बुकिंग!
दोघांवर सदोष मनुष्यवध (Culpable Homicide) आणि गंभीर निष्काळजीपणा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. समानांतर सुरु असलेल्या चौकशीतून उघड झाले की, आगीच्या रात्रीच जेव्हा अग्निशमन दल आणि पोलीस 'Birch by Romeo Lane' मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी लुथ्रा बंधूंनी थायलंडच्या तिकिटांची बुकिंग केली होती. ७ डिसेंबर रोजी रात्री १:१७ वाजता, अग्निशमन दल आणि पोलीस अद्याप आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना, सौरभ व गौरव यांनी ‘MakeMyTrip’ वरून दिल्ली-फुकेत या इंडिगो फ्लाइट (6E 1073) ची तिकिटे बुक केली आणि पहाटे ५:३० वाजता भारतातून निघाले.
“पळून नाही, बिझनेस मीटिंगला गेलो”
दिल्लीतील रोहिणी न्यायालयात भारताबाहेरूनच दोघांनी ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी बेल मागितली असून, याचिकेत त्यांनी आपण त्या इमारतीचे मालक नसून फक्त लाइसन्सधारक आहोत असा दावा केला. तसेच, आग लागल्यानंतर पळाल्याचा आरोप फेटाळत त्यांनी थायलंडला बिझनेस मीटिंगसाठी गेल्याचे सांगितले. घटनेच्या वेळी नाइटक्लबमध्ये उपस्थितही नव्हते, असंही त्यांनी याचिकेत नमूद केलं आहे. चार आठवड्यांचे अटकपूर्व संरक्षण आणि भारतात परतल्यानंतर तातडीने अटक होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. न्यायालयाने या याचिकेची सुनावणी घेतली, मात्र अंतरिम दिलासा देण्यास नकार देत पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख दिली.
या दरम्यान, क्लबचा स्वतःला ‘सायलेंट पार्टनर’ म्हणवणारा अजय गुप्ता याला दिल्लीतून अटक करून गोव्यात आणण्यात आले आहे. बुधवारी रात्री ९.४५ वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्ता याला आणले गेले. त्याला पुढील चौकशीसाठी अंजुना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.