गोव्यात नाइट क्लबमधील अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू; सहा जण जखमी

अग्निसुरक्षा नियमांचे कोणतेही पालन या क्लबने केलेले नाही. त्यामुळेच या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
गोव्यात नाइट क्लबमधील अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू; सहा जण जखमी
Published on

पणजी : गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाइट क्लबमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून आठवडाभरात त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. याप्रकरणी ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’चा व्यवस्थापक आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

मृतांमध्ये ४ पर्यटक, १४ कर्मचाऱ्यांचा समावेश असून अन्य सात जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, दोघांचा मृत्यू आगीत होरपळून तर उर्वरितांचा धुरामुळे गुदमरून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गोव्याचे पोलीस प्रमुख आलोक कुमार म्हणाले की, “सिलिंडर स्फोटामुळे ही दुर्घटना घडली.” घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकेल लोबो घटनास्थळी पोहोचले. “अग्निसुरक्षा नियमांचे कोणतेही पालन या क्लबने केलेले नाही. त्यामुळेच या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लबला परवानगी देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अरपोरा-नागोआचे सरपंच रोशन रेडकर यांनाही व्यापार परवान्यासंबंधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

मृतांच्या नातेवाईकांसाठी ५ लाखांची मदत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेत नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी मदत जाहीर केली. त्यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मॅनेजरसह चार जणांना अटक, क्लबचा मालक फरार

याप्रकरणी क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे, तर मुख्य व्यवस्थापक आणि आणखी तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ‘एफआयआर’मध्ये क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा, तसेच कार्यक्रम आयोजक आणि मॅनेजर यांची नावे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in