Goa Nightclub Fire Update : लुथरा बंधूंना थायलंडमधून दिल्लीला आणले

गोवा येथील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ या नाइट क्लबमधील आग प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना मंगळवारी थायलंडमधून दिल्लीला आणण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांच्या एका पथकाने दोघांना विमानतळावरच अटक केली. आता त्यांना पतियाळा हाऊस न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले जाईल.
लुथरा बंधूंना थायलंडमधून दिल्लीला आणले
लुथरा बंधूंना थायलंडमधून दिल्लीला आणलेPhoto : X (ANI)
Published on

नवी दिल्ली : गोवा येथील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ या नाइट क्लबमधील आग प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना मंगळवारी थायलंडमधून दिल्लीला आणण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांच्या एका पथकाने दोघांना विमानतळावरच अटक केली. आता त्यांना पतियाळा हाऊस न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले जाईल. ट्रान्झिट रिमांडची परवानगी मिळताच पोलीस दोघांना घेऊन गोव्याला जातील. सौरभ आणि गौरव लुथरा ‘बिर्च नाइट क्लब’चे मालक आहेत. ६ डिसेंबर रोजी क्लबला आग लागली, त्यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर दोन्ही भाऊ थायलंडला पळून गेले होते. थायलंड पोलिसांनी ११ डिसेंबर रोजी फुकेतमध्ये दोन्ही भावांना ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळी त्यांना बँकॉकहून भारतात पाठवण्यात आले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

९ डिसेंबर रोजी थायलंडच्या अधिकाऱ्यांना कळले की, भारतीय सुरक्षा यंत्रणा ज्या भावांना शोधत आहेत, ते फुकेतमध्ये लपले आहेत. भारतीय यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर थायलंडच्या अधिकाऱ्यांनी आधीच हॉटेल्सवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. ११ डिसेंबर रोजी जेव्हा दोघे भाऊ हॉटेलमधून जेवायला बाहेर पडले, तेव्हा थायलंड इमिग्रेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख आणि प्रवासाची माहिती पडताळून पाहिली आणि त्यांना पकडले. दोघांवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि सीबीआयमार्फत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेकडे (इंटरपोल) त्यांच्या अटकेची विनंती केली होती. त्यानंतर इंटरपोलने त्यांच्याविरुद्ध ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. लुथरा ब्रदर्स, त्यांचे व्यावसायिक भागीदार, व्यवस्थापक आणि काही कर्मचारी दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यामुळे गोवा पोलिसांसोबत आता दिल्ली पोलीसही अग्निकांड प्रकरणाचा तपास करत आहेत. दिल्लीतही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in