Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

तब्बल पाच दिवसांनी नाइटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांना थायलंड पोलिसांनी फुकेतमध्ये ताब्यात घेतले आहे. आगीच्या रात्रीच जेव्हा अग्निशमन दल आणि पोलीस आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी लुथ्रा बंधूंनी थायलंडच्या तिकिटांची बुकिंग केली होतीआणि पहाटे ५:३० वाजता भारतातून निघाले.
Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना
PC - ANI
Published on

बँकॉक : गोव्यातील भीषण आगीप्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. गोव्याच्या अर्पोरा परिसरातील 'बर्च बाय रोमियो लेन' (Birch By Romeo Lane) नाइटक्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी नाइटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांना थायलंड पोलिसांनी फुकेतमध्ये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना लवकरच भारतात डिपोर्ट केले जाणार आहे.

थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर लुथ्रा बंधूंचे पासपोर्ट हातात घेतलेले काही फोटो समोर आले आहेत. ताब्यानंतर २४ तासांच्या आत दोघांना भारतात डिपोर्ट केले जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांची टीम थायलंडकडे रवाना झाली आहे. याआधी गोवा पोलिसांच्या विनंतीनुसार परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) लुथरा बंधूंचे पासपोर्ट रद्द केले होते.

आगीच्या वेळीच थायलंडला जाण्याची तयारी

समानांतर सुरु असलेल्या चौकशीतून उघड झाले की, आगीच्या रात्रीच जेव्हा अग्निशमन दल आणि पोलीस 'Birch by Romeo Lane' मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी लुथ्रा बंधूंनी थायलंडच्या तिकिटांची बुकिंग केली होती. ७ डिसेंबर रोजी रात्री १:१७ वाजता, अग्निशमन दल आणि पोलीस अद्याप आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना, सौरभ व गौरव यांनी दिल्ली-फुकेत या इंडिगो फ्लाइट (6E 1073) ची तिकिटे बुक केली आणि पहाटे ५:३० वाजता भारतातून निघाले.

नाईटक्लबमधील ‘सायलेंट पार्टनर’ अजय गुप्ताला अटक

या दरम्यान, क्लबचा स्वतःला ‘सायलेंट पार्टनर’ म्हणवणारा अजय गुप्ता याला दिल्लीतून अटक करून गोव्यात आणण्यात आले आहे. बुधवारी रात्री ९.४५ वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्ता याला आणले गेले. त्याला पुढील चौकशीसाठी अंजुना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

कोर्टाकडून दिलासा नाही

भारताबाहेरूनच, दोघांनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात ट्रान्झिट अँटिसिपेटरी बेल याचिका दाखल करून चार आठवड्यांचे अटकपूर्व संरक्षण आणि भारतात परतल्यानंतर तातडीने अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. सरकारने या मागणीला विरोध करताना सांगितले की, लुथ्रा बंधू जाणीवपूर्वक चौकशीपासून पळ काढत आहेत व त्यांना कोणतेही अंतरिम संरक्षण दिले जाऊ नये. त्यावर लुथ्रा बंधूंच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “ते कामानिमित्त थायलंडला गेले होते आणि आता परत यायचे आहे; मात्र लगेच अटक होईल, अशी भीती आहे.” न्यायालयाने या याचिकेची सुनावणी घेतली, मात्र अंतरिम दिलासा देण्यास नकार देत पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख दिली.

logo
marathi.freepressjournal.in