दिल्लीत दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचा उच्चांक
नवी दिल्ली : जागतिक कलमुळे सलग दुसऱ्या दिवशी भाव वधारत सोन्या-चांदीच्या दराने मंगळवारी येथील स्थानिक सराफा बाजारात उच्चांक गाठला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव १४० रुपयांनी वाढून ७१,८४० रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला. सोमवारी सोन्याचा भाव ७१,७०० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर बंद झाला होता. चांदीचा भाव ५०० रुपयांनी वाढून ८४,५०० रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. सोमवारी चांदीने प्रथमच ८४,००० रुपये किलोची पातळी ओलांडली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले की, परदेशातील बाजारातील तेजीच्या संकेतांमुळे दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याची किंमत (२४ कॅरेट) ७१,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाली असून मागील दराच्या तुलनेत १४० रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स येथे स्पॉट गोल्ड २,३५० डॉलर प्रति औंसवर होते आणि मागील बंदच्या तुलनेत त्यात १४ डॉलरने वाढले.
सोन्याचे दर दररोज नवीन उच्चांकावर पोहोचत आहेत. पुढे, डॉलर निर्देशांक कमी झाला आणि यूएस ट्रेझरी उत्पन्न कमी झाले तर सुरक्षित गुंतवणूक हवी म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढत आहे, असे गांधी म्हणाले. याशिवाय, चांदीचा भावही प्रति औंस २८.०४ डॉलरवर वाढला. मागील दर प्रति औंस २७.८० अमेरिकन डॉलर इतका होता.
आगामी यूएस कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) आकडेवारीचा सोन्याच्या किमतींवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा आहे. किमती आधीच उंचावलेल्या पातळीवर असल्याने या आकडेवारीने नफावसुलीला चालना देऊ शकतो. त्यामुळे सोन्याचा दर अंदाजे ७० हजारांपर्यंत घसरू शकतो. फ्युचर्स व्यवहारामध्ये दिवसभरात एमसीएक्सवर सोन्याचा भाव ७१,७३९ रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. धातूचा सर्वाधिक व्यापार झालेला जून करार ५ वाजता ५६९ रुपयांनी किंवा ०.८ टक्क्यानी वाढून ७१,४८१ रुपयांवर होता. सोन्याच्या ऑगस्टमधील डिलिव्हरी कराराने दिवसभरात ७२ हजारांची पातळी ओलांडली.