

मुंबई (पीटीआय) : केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात १५ टक्के वाढ केल्याने देशातील हिरे आणि सुवर्ण उद्योगासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या निर्णयामुळे बाजारात सोन्याच्या तस्करीला ऊत येईल आणि 'ग्रे मार्केट' म्हणजेच समांतर अर्थव्यवस्था फोफावण्याची भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. आयात शुल्कातील वाढीमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होणार असून, याचा थेट परिणाम दागिन्यांच्या व्यापारावर होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
निर्यातदारांच्या मते, आयात शुल्कातील वाढीमुळे किमती वाढतात. अलीकडच्या काळात सोन्याचे दर दुप्पट होऊनही आयातीत फारशी घट झालेली नाही. अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे तस्करीला प्रोत्साहन मिळते आणि निर्यातीचा खर्चही वाढतो. या धोरणाचा सर्वाधिक फटका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बसणार आहे. हे उद्योग या क्षेत्राचा कणा मानले जातात आणि सध्या ते मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या टंचाईचा सामना करत आहेत.
'ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल'चे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले की, आयात शुल्कातील वाढीमुळे व्यापार करणे आता कठीण होणार आहे. तस्करी वाढण्याची आणि देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण होण्याची भीती उद्योगाला वाटत आहे. सीमा शुल्क, जीएसटी आणि कृषी उपकर मिळून सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे सुमारे २७,००० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. या धोरणात्मक निर्णयावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी 'जीजेसी'ने मुंबईत उद्योगातील सर्व संघटनांची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, उद्योगाने सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा आदर केला असून, ही वाढ तात्पुरती स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. 'जीजेसी'चे उपाध्यक्ष अविनाश गुप्ता यांनी सांगितले की, सोने आणि दागिने हे भारतीय अर्थव्यवस्था, परंपरा आणि बचतीच्या संस्कृतीशी खोलवर जोडलेले आहेत. अशा वेळी व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने व्यवसाय करणे आवश्यक आहे. 'जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल'चे (जीजेपीसी) अध्यक्ष किरीट भन्साळी यांनीही या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. बँकांकडून शुल्कापोटी मागितली जाणारी हमी रक्कम आणि खेळत्या भांडवलाची अडचण यामुळे निर्यातीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोन्याच्या आयातीत २४ टक्क्यांहून अधिक वाढ
पश्चिम आशियातील संकटामुळे वाढलेले आयात बिल कमी करण्यासाठी सरकारने बुधवारी सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्के केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी परकीय चलन वाचवण्यासाठी सोने खरेदीवर मर्यादा आणण्याचे आणि काटकसरीचे आवाहन केले होते. भारताची सोन्याची आयात २०२५-२६ मध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढून ७१.९८ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.