
नवी दिल्ली : यंदा भू राजकीय परिस्थिती व अन्य आर्थिक कारणांमुळे सोन्याचे दर एक लाखापर्यंत पोहचले होते. आता एप्रिलनंतर येत्या डिसेंबरमध्येही सोन्याचे दर १० ग्रॅमला एक लाखावर जाण्याची शक्यता आहे.
यंदा अमेरिकेचे टॅरिफ, ऑपरेशन सिंदूर, इराण-इस्रायल युद्ध अशा घडामोडींमध्येही सोन्याने जबरदस्त परतावा दिला आहे. आयसीआयसीआय बँक ग्लोबल मार्केट्सच्या म्हणण्यानुसार, भारतात सोन्याच्या दरवाढीचा हा कल २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीतही कायम राहू शकतो. त्यामुळे शक्यता आहे की वर्षाच्या अखेरीस १० ग्रॅम सोन्याची किंमत पुन्हा एकदा एक लाखापर्यंत जाऊ शकते. देशात सोन्याच्या किमतींमध्ये वाढीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. सध्या १० ग्रॅमसाठी ९६५०० ते ९८५०० रुपये सोन्याचे दर आहेत. दुसऱ्या सहामाहीत ते ९८५०० ते १ लाखांपर्यंत पोहचू शकतात. इराण-इस्रायल दरम्यान युद्धविराम आणि अमेरिका-चीन व्यापार करारासंदर्भातील चर्चांमुळे अलीकडच्या काळात सोन्याच्या दरांमध्ये थोडीशी नरमी पाहायला मिळाली आहे.
सोन्याचे दर वाढल्यास त्याची किरकोळ मागणी कमी होते आणि आयातीतही घट होते. मेमध्ये सोन्याची आयात २.५ अब्ज डॉलर झाली, जी गेल्या महिन्यात ३.१ अब्ज डॉलर होती. तरीही २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याने तब्बल २८ टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांत सोन्याने २३७.५ टक्के जबरदस्त परतावा दिला आहे.