

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि दिवाळीनंतर मागणीत आलेल्या घटीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरातील घसरण सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. शुक्रवारी दिल्लीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे २,५०० रुपयांची मोठी घट झाली. त्यामुळे सोन्याचा भाव १ लाख ४० हजार ९०० रुपयांवर आला.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर गुरुवारच्या १ लाख ४३ हजार ४०० रुपयांवरून घसरून १ लाख ४० हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम (सर्व करांसह) झाला.
दरम्यान, चांदीच्या दरातही पुन्हा घसरण झाली. मागील सत्रात स्थिर राहिलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी प्रति किलोमागे ३,५०० रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचा दर १ लाख ८४ हजार रुपये प्रति किलोवर आला. मागील सत्रात हा दर १ लाख ८७ हजार ५०० रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि दिवाळी सणानंतर किरकोळ बाजारातील मागणी मंदावल्यामुळे शुक्रवारी देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर दबाव कायम राहिला.
जिओटस डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सुब्बुराज यांच्या मते, अमेरिकेतील ट्रेझरी बाँडवरील वाढते उत्पन्न आणि डॉलरची मजबूत स्थिती यामुळे चांदीच्या दरातही मोठी घसरण होत आहे.