

नवी दिल्ली : भू-राजकीय संघर्षांशी सोन्याचे असलेले पारंपरिक नाते आता बदलत आहे. केवळ युद्ध किंवा तणावापेक्षा महागाई, व्याजदर आणि मध्यवर्ती बँकांचे पतधोरण हे सोन्या-चांदीच्या किमती ठरवणारे अधिक महत्त्वाचे घटक बनले आहेत, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे प्रसिद्ध अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या सहामाहीत स्पष्ट झाले आहे की, केवळ भू-राजकीय धोके सोन्याच्या किमतीतील तेजी टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे नाहीत. गुंतवणूकदार संघर्षाचा महागाई आणि व्याजदरांवर काय परिणाम होतो, या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत.
व्याजदर आणि बाँड यील्डचा सोन्यावर प्रभाव
वर्षाच्या सुरुवातीला धोरणात्मक अनिश्चितता, ईटीएफमधील गुंतवणूक, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळे सोन्याला मजबूत पाठबळ मिळाले होते. मात्र, आयात शुल्कामुळे उत्पादनावरील खर्च आणि महागाईच्या अपेक्षा वाढल्याने चित्र बदलले. यामुळे दीर्घकाळासाठी व्याजदर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता निर्माण झाली, ज्याने ट्रेझरी यील्ड आणि डॉलरचे मूल्य वधारले.
येत्या कालावधीत ६ ते ८ टक्के घसरणीची शक्यता
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने सोन्या-चांदीचा अंदाज आणि महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार सध्याच्या पातळीवरून मौल्यवान धातूच्या दरांमध्ये येत्या कालावधीत ६ ते ८ टक्के घसरणीची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्पकालीन कालावधीसाठी (१२-१५ महिने) दराचे उद्दिष्ट $४,८०० ते $५,५०० प्रति औंस आहे. तर स्थानिक/भारतीय बाजार उद्दिष्ट (प्रति १० ग्राम) हे ₹१.६८ लाख, त्यानंतर ₹१.९३ लाख आहे. यासाठी गृहीत धरलेला डॉलर/रुपया दर ९५.५० आहे.
अमेरिकन-इराण तणाव : अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे सुरुवातीला सोन्याची मागणी वाढली.
चीन, जपानची भूमिका : मध्यवर्ती बँकेची खरेदी, चांदीची मागणी यामुळे तो महत्त्वाचा घटक राहील.
किमतीचा अंदाज : सोन्याच्या दरात सध्याच्या पातळीवरून ६ ते ८ टक्क्यांची घसरण होऊ शकते. तथापि, पुढील १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $ ५,५०० प्रति औंस पार करू शकते.
भारतीय बाजारातील उद्दिष्ट : डॉलर/रुपया दर ९५.५ गृहीत धरल्यास, मध्यम कालावधीत स्थानिक बाजारात सोने ₹१.६८ लाख प्रति १० ग्राम आणि त्यानंतर ₹१.९३ लाख प्रति १० ग्रामपर्यंत पोहोचू शकते.
२०२६ च्या पहिल्या सहामाहीने हे दाखवून दिले आहे की युद्ध आणि सोन्यामधील संबंध आता अधिक अटींवर आधारित झाले आहेत. जागतिक तणाव असूनही वाढते बाँड यील्ड हे सोन्यासाठी मुख्य आव्हान ठरले आहे. याने सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पारंपरिक मागणीला मागे टाकले आहे.
नवनीत दमानी, (रिसर्च हेड - कमोडिटीज, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस