चित्याकडून गुडन्यूज?

चित्ता कन्झर्व्हेशन फंडचे कार्यकारी संचालक लॉरी मार्कर यांच्या मते, आशा गर्भवती असेल तर ती पहिल्यांदा आई होणार आहे.
चित्याकडून गुडन्यूज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी भारतात तब्बल ७० वर्षांनंतर चित्त्यांचे आगमन झाले आहे. नामिबियातून आलेले हे चित्ते बघण्यासाठी खूप लोक उत्सुक असताना आता त्यापैकीच ‘आशा’ या चित्त्याने गुडन्यूज दिल्याची चर्चा आहे.

चित्त्यांची देखरेख करणाऱ्या एका टीमने ‘आशा’ या मादी चित्त्यामध्ये गर्भवती असल्यासारखी लक्षणे दिसू लागली आहेत. ‘आशा’ हिचे वय साडेतीन वर्षे असून लवकरच देशात चित्त्यांची संख्या वाढणार असल्याचे आशा वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र अद्याप याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी कुनो नॅशनल पार्कमध्ये वन अधिकारी या मादी चित्त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

चित्ता कन्झर्व्हेशन फंडचे कार्यकारी संचालक लॉरी मार्कर यांच्या मते, आशा गर्भवती असेल तर ती पहिल्यांदा आई होणार आहे. तिच्यासाठी एक वेगळीच जागा आरक्षित ठेवावी लागणार असून आजूबाजूचे वातावरण शांत ठेवायला हवे. तिच्या सभोवताली खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था ठेवावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कुनो अभयारण्यातील वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आशा थेट नामिबियातील जंगलातून येथे आल्यामुळे ती गर्भवती असल्याची दाट शक्यता आहे. तसेच तिच्या व्यावहारिक, शारीरिक आणि हार्मोन्समधील बदलांमुळे ती गर्भवती असल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळत आहे; मात्र ती गुडन्यूज सत्यात उतरण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. १७ सप्टेंबरला हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. आठ चित्त्यांमध्ये पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in