नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांचे एक्झिट पोल कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमताचे संकेत देत नसताना देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मात्र एक चांगली बातमी आहे. यंदाच्या २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशाची अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढली आहे. यंदा पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून दरम्यान भारताचा विकास दर ७.८ टक्के होता. रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आरबीआयच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी भारतीय अर्थव्यवस्थेने केली आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. कारण चीनची अर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या काळात ४.९ टक्के दराने वाढली आहे.
केंद्राच्या सांख्यिकी व प्रकल्प अंमलबजावणी खात्याने दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. भारताचा विकास दर ४१.७४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत ३८.१७ लाख कोटी रुपये जीडीपी होता.
दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची १३.९ टक्के, कृषी क्षेत्राचा विकास दर १.२ टक्के, बांधकाम क्षेत्राचा विकास दर १३.३ टक्के राहिला आहे. तसेच व्यापार, हॉटेल, वाहतूक, कम्युनिकेशन व प्रसारण आदी क्षेत्राचा विकास दर ४.३ टक्के राहिला. गेल्यावर्षी याच काळात या क्षेत्राचा विकास दर १५.६ टक्के होता. वित्त, बांधकाम व व्यावसायिक सेवांचा विकास दर ६ टक्के राहिला, तर गेल्यावर्षी याच काळात या क्षेत्राचा विकास दर ७.१ टक्के राहिला. वीज, गॅस, पाणीपुरवठा आदींचा विकास दर १०.१ टक्के राहिला, तर गेल्यावर्षी या क्षेत्राचा विकास दर ६ टक्के होता, असे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीत म्हटले आहे.