राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास गोपाळकृष्ण गांधी यांचाही नकार

गोपाळकृष्ण गांधी यांनी एक निवेदन जारी करत विरोधकांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. देशभरातून ज्याला सर्वसहमती असेल अशाच व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असे गांधी म्हणाले
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास गोपाळकृष्ण गांधी यांचाही नकार

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवार म्हणून योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची उमेदवारी नाकारली आहे. त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे नातू तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनीदेखील विरोधी पक्षांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी माझ्यापेक्षा दुसरा एखादा सर्वसमहमती असलेला उमेदवार द्यावा, असे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र, गोपाळकृष्ण गांधी यांनी एक निवेदन जारी करत विरोधकांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. देशभरातून ज्याला सर्वसहमती असेल अशाच व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असे गांधी म्हणाले.

“काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देण्याचा विचार केला जातोय. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मात्र, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार राष्ट्रीय पातळीवर सर्वसहमती निर्माण करणार असावा. माझ्यापेक्षा दुसरी एखादी व्यक्ती हे प्रभावीपणे करु शकेल असे मला वाटते. त्यामुळे अशाच एखाद्या व्यक्तीला ती संधी द्यावी, अशी विनंती मी या नेत्यांना करतो,” असे गोपाळकृष्ण गांधी आपल्या निवेदनात म्हणाले.

शरद पवार, फारुक अब्दुल्ला यांच्यानंतर गोपाळकृष्ण गांधी यांनीही नकार दिल्यामुळे विरोधकांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आता नवा चेहरा शोधावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in