नवी दिल्ली : ज्येष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून ते गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. विद्यमान गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
बनारस हिंदू विद्यापीठातून मोहन यांनी बी. टेक केले असून ‘आयआयएम अहमदाबाद’ येथून डिप्लोमा केला आहे. १९८९ च्या सिक्कीम तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. मोहन यांची केंद्रीय गृह खात्यात ‘ओएसडी’ म्हणून यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. सिक्कीम व केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. केंद्र सरकारच्या सेवेत असलेले मोहन हे अत्यंत हुशार अधिकारी आहेत. केंद्रीय गृह खात्यात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी केंद्रशासित प्रदेशांसह विविध खात्यात काम केले आहे.
‘कोविड-१९’ काळात त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचे काम केले होते. तसेच राज्यांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.