पीएम सूर्य घर मोफत वीज प्रकल्प मंजूर; ७५ हजार कोटी खर्च, १ कोटी घरांना फायदा; वैशिष्ट्ये काय?

तब्बल ७५ हजार कोटी रुपयांच्या पीएम सौरऊर्जा छत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी मंजुरी दिली. या योजनेचा फायदा देशातील एक कोटी कुटुंबांना होणार आहे.
पीएम सूर्य घर मोफत वीज प्रकल्प मंजूर; ७५ हजार कोटी खर्च, १ कोटी घरांना फायदा; वैशिष्ट्ये काय?
Published on

नवी दिल्ली : तब्बल ७५ हजार कोटी रुपयांच्या पीएम सौरऊर्जा छत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी मंजुरी दिली. या योजनेचा फायदा देशातील एक कोटी कुटुंबांना होणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत एका कुटुंबाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळू शकेल. या योजनेंतर्गत प्रति एक किलोवॉट सिस्टिमवर प्रत्येक कुटुंबाला ३० हजार रुपयांचे अनुदान मिळेल, तर २ किलोवॉटवर ६० हजार रुपयांचे अनुदान मिळेल.

या योजनेंतर्गत, कोणतेही कुटुंब राष्ट्रीय पोर्टलला भेट देऊन अनुदानासाठी अर्ज करू शकते. छत सोलर स्कीमसाठी कुठल्याही विक्रेत्याची निवड करू शकतात. याशिवाय त्यांना कमी व्याजाने कर्जही मिळू शकते. याचबरोबर, सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर योजना बनवण्याचा निर्णयही घेतला आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी या गावांना रोल मॉडेल म्हणून तयार करण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

-या योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळेल. यामुळे महिन्याला हजारो रुपयांची बचत होईल.

-सोलर प्रकल्पातून अतिरिक्त वीज विकून पैसा कमावता येईल.

-रहिवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून ३० गिगावॉटवीजही तयार होईल.

-यामुळे कार्बन उत्सर्जनातही पुढील २५ वर्षांत ७२० दशलक्ष टनपर्यंतची घट होईल.

-या योजनेत उत्पादक, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांच्या माध्यमातून १७ लाख रोजगार तयार होईल.

logo
marathi.freepressjournal.in