
नवी दिल्ली: आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समाविष्ट केलेले 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द हटवण्याचा कोणताही सध्याचा विचार किंवा योजना केंद्र सरकारपुढे नाही, अशी माहिती राज्यसभेत गुरुवारी देण्यात आली.
सरकारने यासंदर्भात कोणतीही विधी किंवा घटना दुरुस्तीची प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू केलेली नसल्याचेही सभागृहाला सांगण्यात आले.
केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लेखी उत्तरात सांगितले की, काही सार्वजनिक किंवा राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र सरकारकडून या राज्यघटनेतील या संज्ञांमध्ये बदल करण्याबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव नाही.
"सरकारची अधिकृत भूमिका अशी आहे की, राज्यघटनेच्या प्रस्ताविकेतून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द हटवण्याचा किंवा त्यांचा फेरविचार करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. या बदलाबाबत कोणताही बदल करण्यासाठी सखोल चर्चा आणि व्यापक सहमती आवश्यक असते, परंतु सध्या सरकारकडून कोणतीही औपचारिक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही," असे मंत्री मेघवाल यांनी स्पष्ट केले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १९७६ मध्ये करण्यात आलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीस (ज्याद्वारे हे शब्द घालण्यात आले) विरोधात दाखल याचिका फेटाळल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय संदर्भात 'समाजवाद' याचा अर्थ कल्याणकारी राज्य असा होतो आणि तो खासगी क्षेत्राच्या वाढीस अडथळा ठरत नाही, तर 'धर्मनिरपेक्षता' ही राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा अविभाज्य भाग आहे.
काही सामाजिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांच्या आक्षेपाबाबत ते म्हणाले की, काही गट अशा गोष्टींचा पुनर्विचार व्हावा अशी मते मांडत असतील. या कृतीमुळे या विषयावर सार्वजनिक चर्चा किंवा वातावरण तयार होऊ शकते, पण ते सरकारची अधिकृत भूमिका किंवा कृती दर्शवते असे नाही," असे ते म्हणाले.
गेल्या महिन्यात तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत आणीबाणीच्या काळात घालण्यात आलेले हे शब्द एक 'दीर्घकाळ टिकलेले जखम' असल्याचे सांगितले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या मूल्यांबाबत राष्ट्रीय चर्चेची मागणी केल्यानंतर राजकीय वादंग सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर धनखड यांनी प्रास्ताविक ही "पवित्र" असून "बदलू नये" अशी भूमिका मांडली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, हे शब्द घालणे ही "सनातन धर्माच्या आत्म्याचा अवमान" आहे.