
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दोन वर्षांनंतर प्रथमच नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील ‘ओएनजीसी’ला लिलावाशिवाय वाटप केलेल्या वारसा किंवा जुन्या क्षेत्रांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ६.७५ डॉलरवरून ६.४१ डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स (एमएमबीटीयू) पर्यंत कमी करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ मध्ये सरकारने अशा गॅसच्या किमतीसाठी नवीन फॉर्म्युला आणल्यानंतरची ही पहिलीच कपात आहे. या निर्णयामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड आणि अदानी-टोटल गॅस लिमिटेड आदी शहरी गॅस किरकोळ विक्रेत्यांना मोठा फायदा होईल.
सीएनजी, पीएनजीच्या दरात कपात शक्य
सरकारच्या निर्णयानंतर, ग्राहकांनाही मोठा फायदा मिळेल. तज्ज्ञांच्या मते, या कपातीमुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती २ ते ३ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.