दोन वर्षांत पदवीधर शक्य; विद्यापीठ अनुदान आयोगाचे धोरण तयार

सध्या पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चार वर्षांचा कालावधी लागतो. विद्यार्थ्यांना चार वर्षे घालवणे अनिवार्य असते. पण, विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्यास तशी सोय विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) करून देणार आहे. ४ वर्षांऐवजी दोन ते अडीच वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
दोन वर्षांत पदवीधर शक्य; विद्यापीठ अनुदान आयोगाचे धोरण तयार
Published on

नवी दिल्ली : सध्या पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चार वर्षांचा कालावधी लागतो. विद्यार्थ्यांना चार वर्षे घालवणे अनिवार्य असते. पण, विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्यास तशी सोय विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) करून देणार आहे. ४ वर्षांऐवजी दोन ते अडीच वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

येत्या २०२५-२६ पासून पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना लवचिक अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना ४ ऐवजी दोन ते अडीच वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आयआयटी मद्रासच्या कार्यक्रमात दिली. आयआयटी मद्रासचे संचालक वी. कामाकोटी यांनी याबाबतचे धोरण तयार करण्याची सूचना केली होती.

यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले की, भविष्यात पदवी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. सध्या पदवी मिळवण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतात. आता ती दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करता येऊ शकेल, तर शिक्षणात कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ वर्षांपर्यंत पदवी पूर्ण करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. यूजीसी या नवीन पॅटर्नवर विचार का करत आहे, त्यावर ते म्हणाले की, उच्च शिक्षणाला सोपे बनवण्याचा यूजीसीचा विचार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील. या धोरणाची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

विद्यार्थी हा पर्याय कसा निवडू शकतात, यावर त्यांनी सांगितले की, गुणवान विद्यार्थ्यांनी दोन वर्षांत क्रेडिट स्कोर पूर्ण केल्यास त्यांना पदवीसाठी तीन किंवा पाच वर्षांचा कालावधी लागणार नाही.

विद्यार्थ्यांना ब्रेक घेता येणार

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत यूजीसी पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थी मध्येच ब्रेकही घेऊ शकतात. त्यानंतर पुन्हा ते आपली पदवी पूर्ण करू शकतात. देशाच्या विकासात मदत करू शकतील, या पद्धतीने आम्हाला विद्यार्थ्यांची जडणघडण करायची आहे, असे जगदीश कुमार म्हणाले.

यूजीसीने यापूर्वी अनेक पर्याय विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्यामुळे अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी ब्रेक घेऊ शकतील. त्यानंतर आपल्या वेळेनुसार, अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी देणे व अभ्यासक्रमात लवचिकता ठेवणे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in