
नवी दिल्ली : दिवाळीमध्ये दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये (एनसीआर) हरित फटाक्यांची विक्री करण्यासाठी आणि ते फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी काही नियमांसह परवानगी दिली. केंद्र सरकार आणि दिल्ली-एनसीआरमधील राज्य सरकारांनी ग्रीन फटाक्यांना परवानगी देण्याची विनंती केल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे निर्देश जारी केले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत हरित फटाक्यांची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली असून दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत हरित फटाके फोडता येणार आहेत. मात्र ई-कॉमर्स संकेतस्थळावरून फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही.