वाढवण बंदराला हिरवा कंदील; केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता १४ पिकांच्या एमएसपीत वाढ

पालघर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत वाढवण बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. हा प्रकल्प ७६,२०० कोटी रुपयांचा आहे.
वाढवण बंदराला हिरवा कंदील; केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता १४ पिकांच्या एमएसपीत वाढ
Published on

नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत वाढवण बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. हा प्रकल्प ७६,२०० कोटी रुपयांचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीतील निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले.

जेएनपीए आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची विशेष कंपनी (एसपीव्ही) वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिडेट ही या बंदराची बांधणी करणार आहे. या बंदराचा समावेश जगातील पहिल्या दहा बंदरात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या संपूर्ण देशातील सर्व बंदराची जेवढी क्षमता आहे. ती क्षमता एकट्या वाढवण बंदराची असेल. बंदराची खोली जितकी जास्त असते तितके ते महत्वपूर्ण असेल. वाढवण येथे नैसर्गिक खोली २० मीटर आहे. ती अत्यंत चांगली आहे. या बंदराच्या उभारणीसाठी सर्व भागधारकांशी चर्चा झाली आहे. बंदराच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. स्थानिक लोकांच्या फायद्याचा निर्णय घेतला जाईल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे १२ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या बंदरात ९ कंटेनर टर्मिनल, चार मल्टीपर्पज बर्थ, चार द्रवरूप कार्गो बर्थ, रो रो बर्थ व कोस्ट गार्ड बर्थ असतील. सर्व प्रकारच्या हवामानात हे बंदर कार्यरत राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका व कापूससह १४ पिकांचा एमएसपी वाढवला आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी १४ पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. तांदूळचा नवीन एमएसपी २३०० रुपये झाली आहे. त्यात ११७ रुपयांची वाढ झाली. कापूस ७१२१ रुपये (वाढ ५०१), नाचणी ४२९० रुपये, मका-२२२५ रुपये, मूग ८६८२ रुपये, तूर ७५५० रुपये, उडीद ७४०० रुपये तर शेंगदाणा तेल ६७८३ रुपये भाव जाहीर झाला आहे. देशात दोन लाख गोदामे तयार करण्याचे काम सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in