नवी दिल्ली : बनावट कंटेंटच्या माध्यमातून महिलांना बदनाम केले जात असल्याचा मुद्दा राज्यसभा खासदार (उबाठा) प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ ला नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा आणि माहिती तंत्रज्ञान नियमांच्या अंतर्गत कायदेशीर अंमलबजावणीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याचे म्हटले आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी महिलांना लक्ष्य करणारे डीपफेक व्हिडीओ आणि फोटोंच्या विरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते. एक्स प्लॅटफॉर्मचे एआय टूल ‘ग्रोक’चा वापर करून अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर तयार व प्रसारित केला जात असल्याबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांना लक्ष्य करणारा हा प्रकार प्रतिष्ठा, गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षिततेचे गंभीर उल्लंघन असल्याचे सरकारने म्हटले आहे.
अहवाल सादर करा
सराकारने ‘एक्स’ला तत्काळ ग्रोकच्या टेक्निकल आणि गव्हर्नन्स फ्रेमवर्कचा आढावा घेण्याचे, तसेच सर्व बेकायदेशीर कंटेट काढून टाकण्याचे आणि अशा वापरकर्त्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल ७२ तासांमध्ये सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
आवश्यक अटींचे पालन न केल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, तुमच्या प्लॅटफॉर्मवर, त्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांवर माहिती तंत्रज्ञान कायदा, आयटी नियम, बीएनएसएस, बीएनएस आणि इतर लागू असलेल्या कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.
सोशल मीडियावरील महिलांच्या फोटोंचा अनाधिकृत वापर करून एआय ॲपच्या माध्यमातून ते अश्लील पद्धतीने सादर करणे आणि त्यांचे कपडे उतरवल्याचे प्रकार वाढत असल्याच्या मुद्द्याकडे आयटी मंत्र्यांचे तातडीने लक्ष वेधले आणि हस्तक्षेपाची मागणी केली. ग्रोकसारख्या फीचर्सनी महिलांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी नियम असले पाहिजेत. मोठ्या टेक फर्मनी जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असेही चतुर्वेदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.